अमरावती, दि.७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील मोर्शी रोड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) येत्या 11 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता 'प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्या'चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून आयटीआय उत्तीर्ण व अन्य पात्र उमेदवारांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
या भरती मेळाव्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित 'एनआरबी बेअरिंग या कंपनीसह अमरावती जिल्ह्यातील विविध स्थानिक नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यासाठी फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, डिझेल मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिशियन, सीएनसी ऑपरेटर, टूल अँड डाय मेकर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राइंडर, मशीन टूल मेंटेनन्स आणि मोटर मेकॅनिक या व्यवसायातून आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेचे पदवीधर आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांसह अंतिम वर्षात प्रशिक्षण घेत असलेले उमेदवारही या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात.
इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना आपला अद्ययावत बायोडाटा, मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती (झेरॉक्स) सोबत आणणे अनिवार्य आहे. या संधीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक तथा सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments