Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

उन्हाळी सुट्टीत एसटीचा प्रवास भाडे रकमेत हंगामी भाडेवाढ;




अमरावती विभागाकडून साध्या बसच्या भाड्यात 10 टक्के वाढ

अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): उन्हाळी सुट्ट्या, सण-उत्सव आणि लग्नसराईच्या काळात होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने साध्या बसच्या भाड्यात 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ 15 एप्रिल 2026 च्या मध्यरात्रीपासून लागू होणार असून 15 जून 2026 पर्यंत कायम राहणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने महामंडळाला गर्दीच्या काळात 30 टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याची मुभा दिली आहे, त्याअंतर्गत अमरावती विभागाचे सक्षम प्राधिकारी यांनी ही 10 टक्के दरवाढ मंजूर केली आहे.

या निर्णयामुळे साध्या बसचा सध्याचा 10.05 रुपये प्रति टप्पा दर आता 11.05 रुपये इतका होईल. अमरावती येथून विविध महत्त्वाच्या शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. सुधारित दरपत्रकानुसार, अमरावती ते नागपूर प्रवासासाठी आता 290 रुपये (आधी 262), अमरावती ते धारणी 268 रुपये (आधी 242) आणि अमरावती ते अकोला 191 रुपये (आधी 172) मोजावे लागतील. तसेच परतवाडा, दर्यापूर आणि मोर्शी या मार्गांसाठी 91 रुपयांऐवजी 102 रुपये भाडे आकारले जाईल.

महत्त्वाची बाब म्हणजे ही भाडेवाढ केवळ 'साध्या बस' प्रकारासाठीच लागू असून, महामंडळाच्या इतर प्रगत सेवांचे दर पूर्वीप्रमाणेच स्थिर राहणार आहेत. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन महामंडळाला सहकार्य करावे, असे आवाहन अमरावती विभागाचे नियंत्रक सचिन डफळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि प्रवाशांना सेवा देण्यासाठी ही दरवाढ आवश्यक असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.


 

Post a Comment

0 Comments