Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन



अमरावती, दि.२५-३-२०२६:

जिल्ह्यात अंधश्रद्धा, भोंदूगिरी व बुवाबाजीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महा. अनिस) अमरावती जिल्हा व शहर शाखेच्या वतीने काल  दुपारी ३.३० वाजता अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात श्रद्धा शारदा बबन उदावंत उपजिल्हाधिकारी(पुनर्वसन) यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार तसेच भोंदूगिरीच्या प्रकरणांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्यात अलीकडील काळात काही भोंदू बुवा-बाबांच्या प्रकरणांमुळे समाजात चिंता निर्माण झाली आहे. दैवी शक्ती, चमत्कार, ज्योतिष किंवा अध्यात्माच्या नावाखाली अनेक ठिकाणी लोकांची आर्थिक फसवणूक, मानसिक छळ तसेच महिलांचे शोषण होण्याच्या घटना समोर येत आहेत. अशा घटनांमुळे समाजात अंधश्रद्धा वाढण्यास व गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळण्याचा धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या. त्यामध्ये “महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा” प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष प्रत्यक्ष कार्यान्वित करण्याबाबत सूचना देण्याची मागणी करण्यात आली. तसेच भारतीय राज्यघटनेत अधोरेखित केलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये व समाजपातळीवर जनजागृती कार्यक्रम आयोजित करावेत, अशी मागणीही करण्यात आली.
याशिवाय जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जादूटोणाविरोधी कायदा प्रचार-प्रसार समितीची तातडीने बैठक बोलावून त्यामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांना अधिकृतपणे सहभागी करून घ्यावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले. जिल्ह्यात फलज्योतिष, दैवी शक्ती, चमत्कार किंवा बुवाबाजीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पोलीस प्रशासनामार्फत तात्काळ तपास करून आवश्यक त्या ठिकाणी गुन्हे नोंदवून कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.
तसेच अमरावती जिल्ह्यात अशा प्रकारचे भोंदू बुवा-बाबा कार्यरत असल्यास त्यांची माहिती पोलीस पाटील यांच्या माध्यमातून संकलित करून त्यांचा शोध घ्यावा व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ठोस पावले उचलावीत, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन देताना विजय डवरे, प्रफुल्ल मंदा श्रीधर, नरेंद्र धर्माळे, रवींद्र फुले, अमर मालगे, विजय वानखडे, वर्षा गावंडे व विजया करोले हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अमरावती जिल्हा व शहर शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments