Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

खेळाडूंसाठी 'क्रीडा ई-प्रमाण' प्रणाली कार्यान्वित;

 




आता घरबसल्या मिळणार प्रमाणपत्र

अमरावती,दि.13 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने मिळवून देण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने 'क्रीडा ई-प्रमाण' ही अद्ययावत प्रणाली कार्यान्वित केली आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित या प्रणालीमुळे आता खेळाडूंना त्यांचे आरक्षण प्रमाणपत्र घरबसल्या प्राप्त करता येणार असून, यामुळे बोगस प्रमाणपत्रांच्या प्रकारांना पूर्णपणे आळा बसेल, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली आहे.

ही नवीन प्रणाली ब्लॉकचेन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे. यामध्ये खेळाडूने माहिती भरल्यानंतर आणि ती मूळ डेटाशी जुळल्यास, अवघ्या २४ तासांच्या आत डिजिटल पडताळणी अहवाल उपलब्ध होतो. प्रत्येक प्रमाणपत्रावर एक अद्वितीय QR कोड असेल, ज्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा पोलीस भरती यांसारखे नियुक्ती प्राधिकारी प्रमाणपत्राची सत्यता त्वरित पडताळू शकतील. विशेष म्हणजे, आगामी सर्व शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंना आता या 'क्रीडा ई-प्रमाणपत्रा'ची प्रत जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या खेळाडूंनी यापूर्वी विभागीय उपसंचालकांकडून प्रमाणपत्र पडताळणी केली आहे, त्यांनाही आता नवीन प्रणालीद्वारे हे डिजिटल प्रमाणपत्र तयार करून घेणे आवश्यक आहे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला (https://sports.maharashtra.gov.in/) भेट देऊन 'Our Services' मधील '५% Reservation' या टॅबमध्ये नोंदणी करावी. नोंदणीसाठी आधार-संलग्न मोबाईल क्रमांक, वैध ई-मेल आयडी, आधार कार्ड आणि क्रीडा स्पर्धेत प्राप्त प्रावीण्य प्रमाणपत्र (PDF स्वरूपात) आवश्यक आहे. ज्या खेळाडूंची माहिती किंवा प्रमाणपत्रे तांत्रिक कारणास्तव प्रणालीवर दिसत नसतील, त्यांनी support@kridaepramaan.org या ई-मेलवर आपली तक्रार नोंदवावी. सध्या कबड्डी, फेन्सिंग, ट्रायथलॉन (२०२५), ज्युडो (२०२४) आणि कुराश (२०१७-१८ व २०२४-२५) या स्पर्धांचे अभिलेख ऑनलाईन उपलब्ध असून इतर खेळांचे अभिलेख अपलोड करण्याची प्रक्रिया  सुरू आहे, असेही क्रीडा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments