Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

नांदगाव खंडेश्वर येथे तालुका स्तरीय आरोग्य जनसंवाद कार्यक्रम संपन्न



नांदगाव खंडेश्वर :

इकोनेट संस्थेच्या माध्यमातून नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी, मंगरूळ चव्हाळा आणि सातारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच चोर माहुली, धानोरा गुरव, धानोरा फसी, वडूरा, मंगरूळ चव्हाळा उपकेंद्रांमधील आरोग्य सेवांचा मागील सहा महिन्यांपासून सखोल अभ्यास करण्यात आला होता.
या अभ्यासाच्या पार्श्वभूमीवर नागरिक, आरोग्य विभाग आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद घडवून आणण्यासाठी दिनांक १८ मार्च रोजी पदमपाणी मंगलम, नांदगाव खंडेश्वर येथे तालुका स्तरीय आरोग्य जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता वानखडे, सह गटविकास अधिकारी निलेश ठाकरे, इकोनेट संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गौरीताई भोपटकर, इकोनेटचे राहुल साळवी, सुनिता देशमुख, मेडिकल ऑफिसर नितेश हारळकर मंगरूळ चव्हाळा प्राथमिक आरोग्य केंद्र, गुल्हाने सर लोणी प्राथमिक आरोग्य केंद्र, मुकेश पारडे सर द्यामक प्राथमिक आरोग्य केंद्र,महिला व बालकल्याण विभागाचे प्रतिनिधी, अपेक्षा या संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते सोमेश्वर चांदूरकर, समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्था अध्यक्ष बाबूसिंग पवार, सुनील धनविजय, पत्रकार उमेश चौकुडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच आरोग्य विभागातील अधिकारी, तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये तालुक्यातील ओंकारखेडा, शिरपूर, धानोरा फसी, वडूरा, हिंगलाजपूर देवी, हिवरा, मुरादे, सावंगी, रोहना, बहिलोरपूर, शिवरा, मंगरूळ चव्हाळा या गावांमधून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.
साधारण १० गावांमधून ३५० पेक्षा अधिक महिला व पुरुष उपस्थित होते.
जनसंवाद सत्रामध्ये नागरिकांनी आरोग्य सेवा घेताना येणाऱ्या अडचणी, योजनांचा लाभ मिळविताना येणारे प्रश्न, अॅम्ब्युलन्स सेवा, दळणवळणाच्या समस्या, औषधांची उपलब्धता तसेच आरोग्य केंद्रांमधील सुविधांबाबत आपले अनुभव मांडले.
विशेष म्हणजे महिलांनीही पुढाकार घेऊन आपले प्रश्न स्पष्टपणे मांडले.या सर्व प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता वानखडे यांनी या अडचणी लक्षात घेऊन आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जातील तसेच नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा यासाठी काम केले जाईल, असे आश्वासन दिले.
तसेच, कार्यक्रमात मांडलेल्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत त्या टप्प्याटप्प्याने सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही देण्यात आली.
कार्यक्रमामध्ये जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, लसीकरण कार्यक्रम तसेच विविध आरोग्य योजनांची माहिती देण्यात आली.
इकोनेट संस्थेच्या माध्यमातून मागील सहा महिन्यांत तयार करण्यात आलेल्या अभ्यास अहवालाचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले.
या जनसंवादामुळे नागरिक, प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्यात थेट संवाद साधला गेला. त्यामुळे आरोग्य सेवांमधील अडचणी समोर येऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पवार यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशासाठी रंजनाताई वानखडे, छायाताई जाधव, रेखा कराड, काजल पवार, अभय पवार, सागर पवार, शिवा पवार,उमेश पवार,हिना पवार संदीप अंभोरे,तसेच इकोनेटची संपूर्ण टीम आणि स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले.व अति जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल मालखेडे सर यांनी या संपूर्ण प्रक्रियेसाठी मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य केले आहे .
एकंदरीत, हा कार्यक्रम केवळ चर्चा न राहता
आरोग्य व्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची एक मजबूत सुरुवात ठरली.
Tags

Post a Comment

0 Comments