वन्यप्राण्यांचा वाढता हैदोस; शिरसगाव कसबा परिसरातील शेतकरी हवालदिल - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, March 5, 2026

वन्यप्राण्यांचा वाढता हैदोस; शिरसगाव कसबा परिसरातील शेतकरी हवालदिल


 गहू,संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान;वनहल्ल्यांविरुद्ध कुंपण कवच हवेच! 

शेकडो वन्यप्राणी शेती परिसरात वावरत असल्याची चर्चा 

शिरसगाव कसबा दिनांक ६,  अक्षय गुर्जर: (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

 चांदुर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा येथील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत.रोही,हरीण, काळवीट,नीलगाय यांसारख्या वन्यप्राण्यांचे कळप शेतात घुसून गहू पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.नीलगाय व रोही यांच्या कळपांकडून गहू खाल्ला जातोच; पण उरलेले पीक पायाने तुडवून पूर्णतः भुईसपाट केले जात असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

एकीकडे शेतीमाल भाव व उत्पादनखर्च पाहता शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत;तर दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या सततच्या उपद्रवामुळे मानसिक तणावात भर पडत आहे. नुकसानभरपाईच्या प्रक्रियेत होणारा विलंब,कागदोपत्री प्रक्रियेत अडथळे आणि तुटपुंजी मदत यामुळे अनेक शेतकरी पीक नुकसानीची तक्रार दाखल करण्यात सुद्धा हयगय करीत असल्याचे शेतकऱ्यांकडून समजले.

● संत्रा कलम व झाडांवरही प्राण्यांचा ताव! 

शि.कसबा महसूल मंडळात संत्रा प्रमुख फळपीक मानले जाते.छोट्या कलमापासून उत्पादनक्षम झाड तयार करण्यासाठी सलग पाच-सात वर्षे प्रचंड मेहनत,खते,औषधे व देखभालीवर आर्थिक खर्च करावा लागतो.मात्र लागवडीच्या सुरुवातीच्या वर्षांतच हरीण व काळवीटे कलमा कुरतडून किंवा तोडून टाकतात.परिणामी वाढ खुंटून बहुतांश वेळा पुन्हा कलमांची लागवड करण्याची वेळ येते.

● वन विभागाकडून कुंपण योजना राबविल्यास पिके सुरक्षित राहणार 

वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या पीक नुकसानीवर प्रभावी उपाय म्हणून वन विभागाने सौरऊर्जेवर आधारित मजबूत संरक्षक कुंपण योजना तातडीने राबविणे गरजेचे आहे.यांमुळे वन्यप्राण्यांचा शेतात प्रवेश रोखता येऊन केवळ तक्रार पुरते मर्यादित न राहता पाहणी करून संवेदनशील भागात प्राधान्याने कुंपण उभारणीसाठी पुढाकार घ्यावा.यामुळे पीक नुकसानीत निश्चितच घट येऊ शकते,अशी मागणी शेतकरी करीत आहे.

 प्रतिक्रिया

माझ्या शेतातील गहू तुडवून टाकला.गेल्या अनेक वर्षांपासून वन्यप्राण्यांपासून पीक नुकसानीच्या घटना घडत आहे.तक्रार दाखल केली असून तात्काळ मदत देण्यात यावी.

 दिलीपराव दाभाडे 

 शेतकरी,पाळा जंगल

शासन निर्णयानुसार त्रिसदस्यीय समिती जो अहवाल देते,त्यानुसार आम्ही तो अर्ज वरिष्ठांना मंजुरीसाठी पाठवितो.कुंपण करिता सध्या अशी काही योजना नाही.

दिनेश वाळके 

 RFO, वन कार्यालय,परतवाडा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages