अमरावती, दि. २६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून अमरावती जिल्ह्यात 'टीबी मुक्त भारत अभियान टप्पा 2' चा शुभारंभ करण्यात आला. आरोग्य व कुटुंब कल्याण व प्रशिक्षण केंद्र, अमरावती येथे आयोजित या विशेष सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्ह्याला क्षयरोगमुक्त करण्यासाठी सूक्ष्म नियोजनावर भर देण्याचे आवाहन केले.
जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल सिरसागर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉ. जोत्सना पोटपिटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पवार आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड आदी यावेळी उपस्थित होते.
जगभरात २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा आरोग्य विभागाने अभियानाचा दुसरा टप्पा अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्घाटन प्रसंगी श्रीमती महापात्र म्हणाल्या, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. हा उपक्रम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचून क्षयरोगाचे निर्मूलन करणे हे आपले ध्येय असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.
डॉ. रमेश बनसोड यांनी प्रास्ताविकेतून अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची रूपरेषा मांडली. या टप्प्यात जास्तीत जास्त रुग्णांचा शोध घेणे, त्यांना वेळेवर औषधोपचार उपलब्ध करून देणे आणि 'निक्षय मित्र' योजनेच्या माध्यमातून सामाजिक सहभाग वाढवणे यावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे सांगितले. तसेच क्षयरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल धांडे यांनी तर आभार पुरुषोत्तम खडसे यांनी मानले. यावेळी आरोग्य विभागातील विविध अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य सेवक उपस्थित होते. जिल्ह्याला टीबीमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची शपथ यावेळी घेण्यात आली.
Post a Comment
0 Comments