जिल्ह्यात ‘महाराजस्व समाधान शिबिरा’त एकाच दिवसात 14 तालुक्यांतील 8 हजारांहून अधिक प्रकरणांचा निपटारा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, March 10, 2026

जिल्ह्यात ‘महाराजस्व समाधान शिबिरा’त एकाच दिवसात 14 तालुक्यांतील 8 हजारांहून अधिक प्रकरणांचा निपटारा



अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): राज्य शासनाच्या 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत (टप्पा क्र. 1) अमरावती जिल्हा महसूल प्रशासनाने अत्यंत प्रभावी कामगिरी बजावली आहे. जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यांमध्ये 7 मार्च रोजी एकाच वेळी राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत एकूण 8 हजार 48 यशस्वी प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून, यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठा प्रशासकीय दिलासा मिळाला आहे. या अभियानात शेतीशी संबंधित कागदपत्रांच्या अद्ययावतीकरणावर विशेष भर देण्यात आला. महसूल विभागाने संपूर्ण जिल्ह्यात एकूण 934 फेरफार नोंदी निकाली काढल्या असून, यामध्ये अमरावती तालुक्यातील वलगाव येथे सर्वाधिक 372 फेरफार प्रकरणांवर यशस्वी कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील 380 अर्जांवर 7/12 उतारा दुरुस्ती तातडीने करण्यात आली.

प्रशासनाने डिजिटल सेवेचा प्रभावी वापर करत नागरिकांना 1 हजार 882 डिजिटल 7/12 उतारे आणि 1 हजार 431 '8-अ' उताऱ्यांचे प्रत्यक्ष वितरण केले. नागरिकांचा वेळ वाचविण्यासाठी अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी, वरुड, अचलपूर, चांदूर बाजार, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, धारणी आणि चिखलदरा या 14 ही तालुक्यांमध्ये 'एक खिडकी' योजना राबवण्यात आली, ज्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या अंतर्गत 865 अर्जांचा यशस्वी निपटारा करण्यात आला, तर विविध शासकीय योजनांसाठी लागणारी एकूण 2 हजार 556 प्रमाणपत्रे लाभार्थ्यांना एकाच छताखाली प्रदान करण्यात आली. स्थानिक पातळीवर प्रलंबित समस्या सोडवल्यामुळे महसूल प्रशासनाप्रती जनतेचा विश्वास वाढला असून, या मोहिमेमुळे भूसंपादन आणि अकृषक परवानग्यांच्या प्रक्रियेलाही मोठी गती मिळाली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) विवेक जाधव यांनी दिली आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages