Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘पीसीबी डिझायनिंग’वर कार्यशाळा संपन्न






अमरावती, दि. ३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): 
 इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी क्षेत्रात पीसीबीचे व्यावहारिक प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता, वास्तविक जगातील इलेक्ट्रॉनिक उत्पादने कशी बनतात हे समजण्यास मदत करते. हीच गरज ओळखून येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे नुकतेच 'पीसीबी डिझायनिंग' या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

स्मार्टफोनपासून ते वैद्यकीय उपकरणांपर्यंत सर्व गॅझेट्समध्ये पीसीबी हा त्यांचा पाया असतो. या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना पीसीबी बोर्डसाठी आवश्यक मूलभूत साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स घटक आणि त्यांची वैशिष्ट्ये, तसेच आधुनिक सॉफ्टवेअरमध्ये स्किमॅटिक आणि लेआउट डिझाइन करण्याची सविस्तर माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना तांत्रिक संकल्पनांवर आधारित 'हँड्स-ऑन' ट्रेनिंगही देण्यात आले. या उपक्रमात तृतीय वर्षातील ७० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या सॉफ्टवेअरवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळविली. विभागप्रमुख पी. आर. देशमुख यांनी या प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थी उद्योगांच्या गरजांनुसार तयार होतात. आजच्या काळात ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस आणि दूरसंचार क्षेत्रात कुशल पीसीबी डिझायनर्सना मोठी मागणी आहे.


Post a Comment

0 Comments