एकोनीसाव्या शतकातील प्रबोधनकारी महान संत वैराग्यमुर्ती संत गाडगे महाराज - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, February 17, 2026

एकोनीसाव्या शतकातील प्रबोधनकारी महान संत वैराग्यमुर्ती संत गाडगे महाराज


 दि.१८ :-(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):- 
भारतात भजन-किर्तन करणारे बाबा महाराज लाखो असतील पण स्वतः कृती करुन समाजातील अनिष्ठ रुढी परंपरावर प्रहार करणारा संत गाडगेबाबा शिवाय दुसरा कुणीही नाही. गाडगेबाबा निरक्षर असूनही उच्चशिक्षीत मानसाला लाजवेल असे विज्ञाननिष्ठ विचार किर्तनातून मांडायचे. किर्तनातून बाबा बुवाबाजी, मंत्रतंत्र, अंगात येणे,  देवाला बळी देणे ह्या किती घातक बाबी आहेत हे जनसामान्यांच्या भाषेत समजावुन सांगत असे, त्यांनी समाजाला रंजल्या, गांजल्यात देव पहावयास सांगीतला आहे. संत गाडगेबाबांनी विद्यालये, आश्रमशाळा, निराधार मुलांसाठी बालकाश्रम, धर्मशाळा स्थापन केल्या आहे.

        आज आपण पहात आहे आधुनिक बुवा, देव्या, भोंदूबाबा, स्वामी महाराजांचा नुसता सुळसुळाट झाला आहे. या भंपक महाराजांच्या नादी समाजातील असंख्य सुशिक्षीत, राजकीय पुढारी, भ्रष्टाचारी अधिकारी वर्ग लागलेला आहे.

       आधीच नापीकीने शेतकरी वर्ग, बेकारीने तरुण वर्ग समस्याग्रस्त आहे. तसेच व्यावसायीक अनिश्चितता, तोकड्या पगारात घरातील समस्यामुळे आलेले नैराश्य अशा समस्यानी ग्रासलेल्या भोळ्याभाबड्या जनतेला भोंदू महाराज आपल्या नांदी लावीत आहे.

       त्यात अजून भर पाडत आहे भागवतकार, प्रवचनकार; डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान वेगवेगळ्या प्रवचनकार बाबा महाराजांचे प्रवचन, भागवतसप्ताह, महायज्ञ, सत्संग, दर्शनसोहळा वगैरे गोंडस नावाने आयोजने केल्या जातात. त्यासाठी गावागावात मोठमोठे बॅनर्स, फ्लेक्स लागलेले दिसतात. तथाकथित ह्या महाराज  लोकांची जणु काही स्पर्धाच असल्याचे जाणवत आहे . काही टीव्ही चॅनल वर त्यांचे विविध चमत्कारी  खोटे प्रयोग  , माळा, फोटो तसेच काही महाभाग आयुर्वेदाचा आधार घेवुन, बाबाचा आर्शिवाद मिक्स केलेली औषधे अशा प्रकारच्या जाहिरात माध्यमातून वस्तुंची विक्री दाखवीत आहे.  तथाकथित अध्यात्माचा बाजार मांडून हे धूर्त भोंदू बाबा धर्म, परमेश्वराचा आधार घेत आहे.कर्मकांड, अंधश्रध्दा यामध्ये समाजाला अधिकाधिक गाडून काही बाबाआपली दुकानदारी चालवित आहे. सोबतच काही टीव्ही. चॅनल्सही स्वतःच्या मालकीची करुन घेतली आहेत. ह्या प्रभावी माध्यमाद्वारे ही धुर्त मंडळी सतत अवैज्ञानिक परंपरा, अनिष्ठ रुढींचा समाज मनावर भडीमार करीत आहेत. या सर्व माध्यमातून ही धुर्त मंडळी काळ्या पैश्याची कोट्यावधीची उलाढाल करुन सर्व सामान्य जनतेला लुटत आहे. हा प्रकार देशासाठी घातक ठरत आहे. आज धावपळीच्या जीवनात असुरक्षितता, असहाय्यतेची भावना वाढत आहे. गरीबी विषमतेने हा देश पोखरुन निघत आहे. निराश झालेला माणूस आधार शोधण्यास अशा भोंदू महाराजांच्या पायाशी जातांना दिसत आहे. समाजातील वर्तमानस्थितीतील मागासवर्गीय आदिवासी  जनतेच्या जीवनाची कुपोषण, कर्जबाजारी शेतकरी, बेरोजगारांची ह्या महाराजांना किंचितही जाणीव दिसत नाही. त्यांची भागवते, भजने, किर्तणे; आत्मा, परमात्मा, योग, सिध्दी, समाधी, सदेही, विदेही, मोक्ष ह्या शब्द समुहातच गुरफटलेली दिसत आहे. यातुनच अधिकाधिक दैववादाकडे वळून समाजाचा अधोगतीस जाण्याचा मार्ग मोकळा होतो.

समाजाच्या उन्नतीकरीता अवघे आयुष्य झिजवणारे खऱ्या अर्थाने संत असलेले कर्मयोगी संत गाडगेबाबांचे विचार समाजात रुजविण्याची आज खरी गरज आहे. 

  कर्मयोग, विवेक, विज्ञान व मानवता आपल्या कृतीतून बाबांनी सांगीतली आहे. मुर्तीपूजा, धार्मीक विधी, कर्मकांडे व बुवाबाजी यावर बाबांनी कटाक्षाने प्रहार  करुन सर्वसामान्य माणसाच्या कल्याणावर भर दिला आहे.

संत गाडगेबाबांनी दिलेल्या दशसुत्री संदेशाचे आज आपण अवलोकन केल्यास, संत गाडगे बाबांचा संदेश_

भुकेल्यांना   -               जेवन

तहानलेल्यांना-            पाणी

उघडयानागड्यांना-     वस्त्र

गरीब मुलामुलींना-      शिक्षणासाठी मदत

बेघरांना-                    आसरा

अंध, पगू, रोग्यांना-     औषधोपचार

बेकारांना-                  रोजगार

पशु, पक्षी, मुक्या प्राण्यांना-   अभय

गरीब तरुण तरुणींचे-          लग्न

दुःखी व निराशांना-             हिंमत


हाच आजचा रोकडा धर्म हीच खरी भक्ती व देवपूजा आहे.

गाडगेबाबांनी समाजाला दिलेला हा दशसुत्री संदेश आज व पुढेही तेवढाच समाजोपयोगी राहील हे सिध्द होते.

लेखक_

सौ.सुरेखा विलासराव दामेधर

(अध्यक्ष)

विदर्भ (पश्चिम)

 अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages