Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

महाशिवरात्रीनिमित्त... ये बहोत पुरानी कहानी है...*


दि. १४ Feb २०२६ :-

   भगवान शंकराने आपला तिसरा नेत्र उघडला तर त्यातून निघणार्‍या अग्निज्वाळांनी संपूर्ण सृष्टी भस्मसात होईल हे लहानपणी वाचलेलं बहुतेकांना आठवत असेल. आज महाशिवरात्री म्हणूनच नव्हे तर लहानपणापासून अनेकदा ऐकत आलेलं हे वाक्य आज पुन्हा एकदा आठवले.असो,वातावरण शुष्क ,पानगळीचा मोसम सुरु झालायं.पाण्याची कमतरता झाडांना जाणवत बाष्पीभवन थांबवण्यासाठी पानांची गळती सुरू झालेली.ज्या झाडांची मुळे खोल गेली आहेत त्यांची पानगळ नाही.ज्यांची पानगळ झाली आहेत त्यांवर भडक फुलांचा साज लवकरचं चढणार यातच सत्य अनंत अनादी भगवंत ओंकार ब्रम्ह शक्ती भक्ती चा संगम असणारी महाशिवरात्री आली आहे.

ऋग्वेदात पाच ऋतू मानले गेले आहेत ज्यात शिशिर ऋतूचा समावेश हेमंत ऋतूशी एकत्रित केला आहे.

या पुरातन काळापासूनच इक्षु म्हणजेच ऊस याला शिशिरातील धरणीचे आच्छादन म्हंटले आहे.आजही संक्रातीनंतर ऊसाचे रस यथेच्छ प्यायला जातो सणांचा विचार करता महाशिवरात्री भक्तिरस सर्वजण घेऊया म्हटलं जातं,प्रेमाने जग जिंकता येत सत्य पण माझ्या महादेवाला फक्त भोळ्या भक्तीने जिंकता येत हे परम सत्य.

महाशिवरात्री हा फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला साजरा केला जाणारा भगवान शिवाचा प्रमुख सण आहे, जो शिव-पार्वती विवाह, तांडव नृत्य आणि महादेवांनी विष प्राशन करून जगाचे रक्षण केल्याच्या स्मरणात साजरा केला जातो या दिवशी शिवभक्त उपवास आणि रात्रभर जागरण करून आध्यात्मिक जागृतीसाठी  शिवाचे ध्यान व पूजा करतात.पौराणिक कथेनुसार, माता पार्वतीने महादेवाला पतीच्या रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली, ज्याचे फळ म्हणून या दिवशी त्यांचा विवाह संपन्न झाला.

असे ही मानले जाते की महाशिवरात्रीच्या रात्रीच भगवान शिवाने तांडव, म्हणजेच सृष्टीचे नवनिर्माण आणि संहाराचे नृत्य केले होते.समुद्र मंथनातून निघालेले हलाहल विष जगाला वाचवण्यासाठी भगवान शिवांनी प्राशन केले आणि ते आपल्या कंठात धारण केले, ज्यामुळे त्यांना 'नीलकंठ' म्हटले गेले. ही रात्र अज्ञानावर ज्ञानाचा विजय, आध्यात्मिक जागरूकता आणि शिवतत्त्वाची अनुभूती घेण्याची रात्र मानली जाते.या दिवशी शिवलिंगाची पूजा केल्याने मोक्ष प्राप्ती होते आणि जीवनातील अडथळे दूर होतात असे मानले जाते.

या दिवशी  शिवलिंगावर बेलपत्र, दूध आणि फुले अर्पण करून उपवास करतात आणि रात्रभर 'ॐ नमः शिवाय' चा जप करतात.

वर्षभर येणार्‍या बारा शिवरात्रींमध्ये फेब्रुवारी-मार्च मध्ये येणार्‍या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्व आहे. या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो. या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर नेतो. याचा वापर करून घेण्यासाठी, या संस्कृतीमध्ये आपण रात्रभर सुरू असणारा उत्सव साजरा करायला सुरुवात केली. नैसर्गिक ऊर्जेच्या या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी, रात्रभर सुरू असणार्‍या या उत्सवातील प्राथमिक आवश्यकता म्हणजे आपण आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून संपूर्ण रात्र न झोपता, जागे राहणे होयं.

योग परंपरेत, शिव देव म्हणून पूजले जात नाही तर त्यांना आदिगुरु, म्हणजे ज्यांच्यापासून योग विज्ञान उगम पावले ते प्रथम गुरु असे मानले जाते. हजारो वर्षे ध्यान केल्यानंतर एके दिवशी ते अत्यंत स्थिर बनले. तो महाशिवरात्रीचा दिवस आहे. त्यांच्यामधील सर्व हालचाल बंद झाली व ते संपूर्णतः स्थिर झाले त्यामुळे योगी महाशिवरात्रीकडे स्थैर्याची रात्र या दृष्टीने पाहतात.

समजुती बाजूला ठेवून दिल्या तरीसुद्धा, योग परंपरेत हा दिवस आणि रात्र महत्वाची मानली जातो याचे कारण हा दिवस अध्यात्माची ओढ असणार्‍या व्यक्तींना प्रचंड संधी उपलब्ध करून देतो. आधुनिक विज्ञान अनेक टप्प्यांमधून पुढे गेलेले आहे आणि आज या निष्कर्षापर्यन्त पोहोचलेले आहे की ज्याला तुम्ही जीवन असे म्हणता, तुमच्या अस्तित्वाबद्दल माहिती असणारी प्रत्येक गोष्ट, तुम्हाला विश्व आणि आकाशगंगा म्हणून माहिती असणारी गोष्ट, या सर्व गोष्टी एकच आहेत आणि त्या लक्षावधी मार्गांनी प्रकाशित होतात हे आज सिद्ध झालेले आहे.

चला तर मग, मनोभावे पूजन करूया...!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


( संकलन )

सौ.कंचन मुरके,अमरावती

Post a Comment

0 Comments