अमरावती, दि. ०३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील अंगणवाड्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा परिषद, आणि 'क्वेस्ट' संस्थेच्या वतीने 'पालवी' या जिल्हास्तरीय प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. नुकतेच या तीन वर्षांच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. या प्रकल्पास टाटा ट्रस्ट आणि मोटिवेशन फॉर एक्सलन्स यांचे आर्थिक सहकार्य लाभले आहे.
या प्रकल्पाचे स्वरूप त्रिसूत्रीवर आधारित आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील सर्व अंगणवाडी सेविकांना सहा-स्तरीय विशेष प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कामात ऑनसाइट सपोर्ट दिला जाणार आहे. दुसऱ्या महत्त्वाच्या घटकांतर्गत धारणी आणि चिखलदरा या आदिवासी पट्ट्यात 'बहुभाषिक शिक्षण' राबविले जाईल. यात कोरकू भाषिक मुलांच्या घरच्या भाषेचा वापर करून त्यांना मराठी माध्यमात शिकण्यास सक्षम केले जाणार आहे. तिसऱ्या घटकात तिवसा तालुक्यातील 75 शाळांमध्ये इयत्ता पहिली व दुसरीसाठी 'पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान' उपक्रम राबवण्यात येणार आहे.
उद्घाटन प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी या प्रकल्पाला प्रशासकीय स्तरावर पूर्ण पाठबळ देण्याचे आश्वासन दिले. त्या म्हणाल्या, अंगणवाडी ते प्राथमिक शाळा असा सलग शिक्षणप्रवाह निर्माण होणे गरजेचे आहे. या अंतर्गत 188 मॉडेल अंगणवाड्या विकसित केल्या जाणार असून, ग्रामपंचायतींच्या मदतीने भौतिक सुविधा आणि शैक्षणिक साहित्य पुरवले जाईल.
यावेळी 'गोष्टरंग' टीमने सादर केलेल्या नाटकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाला विलास मरसाळे, नितीन विशे, मिताली थत्ते आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments