मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल किलोर
अमरावती, दि. ०३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): मेळघाटातील दुर्गम आणि वंचित भागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना विविध शासकीय योजनांशी जोडण्यासाठी येत्या 8 फेब्रुवारी 2026 रोजी धारणी येथे 'विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा' आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली) आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा (मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात पार पडणार आहे. या महामेळाव्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल किलोर आणि अमरावती जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती प्रविण पाटील यांची उपस्थित राहतील.
या महामेळाव्याचा मुख्य उद्देश समाजातील दुर्बल घटक, कामगार, दिव्यांग आणि महिलांना विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनांची माहिती देणे आणि त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हा आहे. शिबिरामध्ये तज्ज्ञ कायदेतज्ज्ञांमार्फत मोफत कायदेशीर सल्ला दिला जाईल, तसेच नागरिकांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कायदेशीर सक्षमीकरण करण्यात येईल. या ठिकाणी विविध शासकीय विभाग आणि स्वयंसेवी संस्थांचे स्टॉल्स उपलब्ध राहणार असून, पात्र लाभार्थ्यांना जागेवरच योजनांमध्ये प्रवेश मिळण्यास मदत होणार आहे.
Post a Comment
0 Comments