अमरावती, दि. ४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हास्तरीय दक्षता समितीची सभा पार पडली. या सभेत या परीक्षा निकोप आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिश मुघल, योजना शिक्षणाधिकारी सुरेश वाघमारे आदी उपस्थित होते.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ह्या दि. 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत करण्यात आल्या आहेत. दहावीच्या परीक्षेला 38,531 विद्यार्थी 187 केंद्रांवरून परीक्षा देणार आहेत. बारावीसाठी 35,934 विद्यार्थी 137 केंद्रांवरून परीक्षा देतील. परीक्षेच्या कामकाजासाठी एकूण 22 केंद्रे स्थापित करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात पोलीस अधिनियम 37 (1) (3) लागू करण्यात आला आहे. केंद्राच्या 500 मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स दुकाने परीक्षा कालावधीत बंद राहतील. सर्व केंद्रांवर हत्यारी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. मंडळाने जाहीर केलेल्या 'उपद्रवी' केंद्रांवर विशेष प्रभावी यंत्रणा राबविली जाईल.
परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीला विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, विद्यार्थ्यांनी केंद्रावर वेळेत पोहोचावे यासाठी परिवहन विभागाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Post a Comment
0 Comments