इयत्ता 10 वी व 12 वीच्या परीक्षेसाठी 'कॉपीमुक्त' अभियानावर भर प्रशासन सज्ज - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, February 7, 2026

इयत्ता 10 वी व 12 वीच्या परीक्षेसाठी 'कॉपीमुक्त' अभियानावर भर प्रशासन सज्ज

 




अमरावती, दि. ०७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात आगामी 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. सन 2025-26 शैक्षणिक वर्षातील 12 वीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून तर 10 वीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. परीक्षेच्या काळात कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष दक्षता समितीची स्थापना करण्यात आली असून तिची पहिली बैठक संपन्न झाली आहे.

यावर्षी अमरावती जिल्ह्यातून 10 वीसाठी 187 केंद्रांवर 28 हजार 531 विद्यार्थी, तर 12 वीसाठी 137 केंद्रांवर 39 हजार 934 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. जिल्हयातील एकूण केंद्रांपैकी 85 टक्के केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. विशेषतः जिल्ह्यातील 34 उपद्रवी आणि 43 संवेदनक्षम केंद्रांवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले असून, तिथे केंद्रप्रमुख आणि पर्यवेक्षकांची अदलाबदल करण्याचे आदेश राज्य मंडळाने दिले आहेत.

यासंदर्भात जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी  विविध विभागांना सूचना दिल्या आहेत. परीक्षा काळात खंडित वीज पुरवठ्याची समस्या उद्भवू नये यासाठी महावितरणला सतर्क राहण्यास सांगितले आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर केंद्रावर पोहोचता यावे यासाठी परिवहन मंडळाने जादा बसचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार असून महसूल विभागाची विशेष भरारी पथकेही कार्यरत राहतील. पंचायत समिती स्तरावरील वर्ग-1 आणि वर्ग-2 च्या अधिकाऱ्यांची नियुक्ती या पथकांमध्ये केली जाणार आहे.

परीक्षेचे गांभीर्य राखण्यासाठी केवळ प्रशासकीय तयारीच नाही, तर विद्यार्थी आणि पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शपथ देखील देण्यात आली आहे. 'कॉपीमुक्त' आणि 'भयमुक्त' वातावरणात प्रत्येक विद्यार्थ्याला आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी, हाच या नियोजनाचा मुख्य उद्देश असल्याचे श्री. येरेकर यांनी सांगितले. 

              सर्व शिक्षक, संस्थाचालक आणि पालकांनी या परीक्षा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही दडपणाशिवाय अभ्यासावर लक्ष केंद्रित करून परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages