तेव्हाची बहिरम यात्रा श्रद्धा, कष्ट आणि समाधानाची होती; आजची यात्रा झगमगाट, वेग आणि 'एन्जॉयमेंट'ची
सातपुड्याच्या कुशीत वसलेली बहिरम देवाची यात्रा ही केवळ धार्मिक उत्सव नव्हे, तर ग्रामीण संस्कृतीचा आरसा होती. मात्र गेल्या सुमारे पंचवीस वर्षात या यात्रेचे स्वरूप झपाट्याने बदलले आहे. तेव्हाची साधी, कष्टप्रद पण समाधान देणारी यात्रा आज वेगवान, तांत्रिक आणि एन्जॉयमेंट-केंद्रित झाली आहे. या बदलत्या यात्रेचा मागोवा घेतला असता समाजातील बदल स्पष्टपणे जाणवतो.
तेव्हाचा प्रवास : बैलबंडी, सायकल आणि पायपीट
२५ वर्षांपूर्वी बहिरम यात्रेला जाणे म्हणजेच एक स्वतंत्र यात्रा असायची. पहाटे अंधारातच बैलबंडीतून निघायचे. घरातील सर्व साहित्य-धान्य, भाजी, भांडी, पाणी-बैलगाडीतच असायचे. काही जण सायकलवरून, तर अनेक भाविक पायीच पाऊलवाटा ओलांडत यात्रास्थळी पोहोचायचे. रस्ते कच्चे, खडबडीत आणि धुळीचे असायचे. प्रवास वेळखाऊ होता, पण उत्साह प्रचंड होता. आज मात्र पक्के रस्ते, दुचाकी, चारचाकी वाहने आणि सार्वजनिक वाहतुकीमुळे काही तासांत यात्रा गाठली जाते. प्रवास सोपा झाला, पण त्या प्रवासातील आपुलकी आणि सामूहिक आनंद हरवला आहे.
दळणवळण व सुविधा : अंधारातून प्रकाशाकडे
पूर्वी वीजपुरवठा अपुरा होता. रात्री कंदील, टॉर्च किंवा चुलीच्या प्रकाशातच मुक्काम व्हायचा. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया यांचा पत्ताच नव्हता. माहिती मिळवण्यासाठी 'जुन्या टूरिंग टॉकीज' आणि लोकांच्या चर्चाच माध्यम असायच्या. आज वीज, मोबाईल नेटवर्क, स्पीकर, एलईडी लाईट्स, सोशल मीडिया लाईव्ह यामुळे यात्रा उजळून निघते, पण त्या प्रकाशात पूर्वीचा साधेपणा हरवला आहे.
तेव्हाचा आनंद : खेळण्यांतून उमलणारे स्वप्न
यात्रेतील खेळण्यांची दुकाने म्हणजे मुलांसाठी स्वप्ननगरी होती. मात्र पैशांची चणचण असल्याने अनेक पालक मुलांना खेळणी घेऊन देऊ शकत नसत. दुकानासमोर उभे राहून, "बाबा, मला खेळणे घेऊन द्या" असे रडत तांडव करणारी लहान मुले आजही अनेकांच्या आठवणीत आहेत. त्या न मिळालेल्या खेळण्यांमधूनही एक वेगळाच आनंद, एक निरागसता होती. आज मुलांच्या हातात मोबाईल, महागडी खेळणी सहज उपलब्ध आहेत; पण त्या क्षणातील समाधान, ती प्रतीक्षा आणि ते भावनिक बंधन कमी झाले आहे.
जेवणाचा कार्यक्रम : श्रम आणि स्वाद
तेव्हा बैलबंडीतून सर्व साहित्य नेले जायचे. यात्रास्थळी पोहोचल्यावर रोडगे-वांग्याची भाजी, मातीच्या हंडीतील मटण असा सामूहिक स्वयंपाक व्हायचा. पहाटे निघून रात्री उशिरा घरी परतायचे. हा प्रवास थकवणारा असला तरी मन तृप्त करणारा होता. आज हॉटेल्स, रेडीमेड जेवण सहज मिळते. कष्ट कमी झाले, पण श्रमातून मिळणारा तो खास स्वाद मागे पडला आहे. एकमात्र नक्की शेणाच्या गौऱ्यावर आजही रोडगे करण्याची परंपरा मात्र बंद पडली नाही.
तेव्हाची यात्रा : सुख-समाधान
पूर्वी यात्रा म्हणजे श्रद्धा, भेटीगाठी, संवाद आणि समाधान यांचा संगम होता. मोबाईल नव्हते, पण माणसं जवळ होती. वेळ होता, संयम होता. आजची यात्रा 'एन्जॉयमेंट' आणि 'मनोरंजन'कडे झुकलेली दिसते. फोटो, व्हिडिओ, स्टेटस यामध्ये अनुभव अडकून पडतो. समाधानापेक्षा गडबड अधिक जाणवते.
बदल अपरिहार्य, पण आठवणी अमूल्य
बदल हा काळाचा नियम आहे. सुविधा वाढल्या, जीवन सोपे झाले, हे नाकारता येणार नाही. मात्र या बदलात बहिरम यात्रेची मूळ आत्मा-साधेपणा, सामूहिकता आणि समाधान-जपणे हीच खरी गरज आहे. बहिरम बाबा आजही लाखो भाविकांना आकर्षित करते. पण जुन्या आठवणी सांगतात- "तेव्हा यात्रा जगली जायची, आज फक्त अनुभवली जाते."
Post a Comment
0 Comments