(12 जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव निमित्ताने)
"मुजरा माझा माँ जिजाऊंना..!"
मुजरा माझा माता जिजाऊंना, जिने घडविले शुर शिवबाला…!
दि.१२ :-(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
छत्रपती सर्वांसाठी भूषणभूत ठरले ते माँ जिजाऊंमुळे.स्वराज्य स्थापनेची मूळ संकल्पना राजे शहाजी यांची होती पण या स्वराज्यस्थापनेची बाग फुलवण्याचे सामर्थ्य शिवरायांना देणाऱ्या जिजाऊ स्वराज़्य संकल्पिका ठरल्या. आज महिला जिजाऊंनी धाडसाने केलेले कार्य डोळ्यासमोर ठेवून आपआपल्या पद्धतीने सोयीने ठामपणे उभ्या राहत आहेत.त्यांचे चरित्र चिंतनाने भगीनींना स्फुरण मिळते. एक स्त्री असूनही धाडस व मुत्सद्दीपणा त्यांनी अंगी कसा बाणला, स्त्रीत्वाच्या मर्यादा आड न आणता शिवरायांना सामर्थ्य कसे दिले या वस्तूस्थिती ची नोंद इतिहासाच्या पानांनी घेतली आणि ही पाने जिजाऊंच्या लेकींना प्रेरणादायी ठरली आहे.
स्त्रियांचा सामाजिक दर्जा सुधारून त्याला उंचावण्याची सुरुवात पावणेचारशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी केली. शिवाजी राजे मध्ययुगीन काळातील पहिले असे सत्ताधीश आहेत, ज्यांनी स्त्रियांच्या दैन्यावस्थेला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली. स्त्रियांसाठी केलेल्या सुधारणा, नियम म्हणजे ‘स्त्री मुक्ती’साठी केलेली क्रांतीच होती. त्यांच्या मनात स्त्री जातीबद्दल उच्च प्रतीचा मानसन्मान होता, हे त्यांच्या कृतीतून वेळोवेळी जगापुढे आले.
मध्ययुगीन काळात स्त्रियांना ‘दास्यत्वा’साठी गुलाम म्हणून वापरले जाई.स्त्री विटंबना, मालकी हे सर्रास चाले. या गोष्टींवर राजांनी बंदी आणली.स्त्री जातीचा आदर त्यांच्या रक्तात माँ जिजाऊंनी भिनवला होता. पर स्त्री ला मातेसमान लेखणारे व शत्रृच्या स्त्रियांचा सन्मान करणारे हे युगपुरुष आपल्या देशात आजही प्रत्येकाच्या हृदयात वास करत आहेत. ते खऱ्या अर्थाने रयतेचे रक्षणकर्ते होते. राजांकडे स्त्री संबंधी गुन्ह्याला क्षमा कुणाला नव्हतीच तर कठोर शिक्षा होती. प्रजेचे रक्षक त्यांचे भक्षक बनले होते, त्या काळात शिवाजी राजे स्त्री रक्षक होते.
राजांनी जे स्त्री विषयक धोरण आखले, ते अमलात देखील आणले. सर्व स्त्रियांना अभय दिल्याचे असंख्य पुरावे इतिहास साक्ष देतो.
आजूबाजूला घडणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटना पाहिल्या की, शिवरायांच्या विचारांची गरज भासते. स्त्री हा कुटुंबाचा प्रमुख घटक आहे. प्रत्येक मातेने आपल्या मुलाला वाढवताना आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या स्त्रियांविषयी माँ जिजाऊं प्रमाणे आदरभावना वाढीस लावणे गरजेचे आहे.पुढे तो स्वत:ची पत्नी व इतर स्त्रियांचा मान सन्मान करेल,त्यांच्याविषयी आदराची भावना ठेवील.शिवरायांना घडवणाऱ्या जिजाऊंचे चरित्र सर्वांना बळ देणारे आहे.हेचं बळ पाठीशी घेवून जिजाऊंच्या लेकी संघर्षातून जीवनात उभ्या राहून माँ साहेबांच्या व शिवरायांच्या विचारांचा डंका वाजवीत आहेत.
कुणाला प्रत्येक गोष्ट सहज सोप्या पद्धतीने मिळते तर कोणाला लढावं लागत. वाटेत येणाऱ्या अडचणींचा,समाजाच्या
मानसिकतेचा सामना करत स्वत:च अस्तित्व आणि आत्मसन्मान टिकवून ठेवत स्वत:ची ओळख तयार करायला संघर्ष करावा लागतो.
अशाचं संघर्षातून वाट काढत आपला ठसा उमटवणाऱ्या जिजाऊंच्या लेकींनी जणू आपल्या वाट्याला आलेली दु:ख आपल्या आत्म्याच्या पाठीवर खंबीरतेचा धागा आणि आत्मविश्वासाची सुई वापरून शिवून घेतले असावे असे मला वाटते.त्यांच्या या जीवनाच्या
प्रवासाची प्रेरणा आणि बळ माँ जिजाऊंचे चरित्र आहे!
माँ जिजाऊंच्या लेकी आम्ही
मनगटी लढण्याची हिंमत ठेवून
माँ जिजाऊं आपणास लवून मानाचा मुजरा...!
कंचन मुरके, अमरावती
Post a Comment
0 Comments