राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, December 19, 2025

राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

 



                    जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव ; महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर


अमरावतीत राज्यस्तरीय स्पर्धा

अमरावती, दि. 20 :(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय आर्चरी (धनुर्विद्या) क्रीडा स्पर्धेतून झारखंड व मणिपूर येथे होणाऱ्या 69 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा मुले व मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे. स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल येथील आंतरराष्ट्रीय आर्चरी रेंजवर 20 डिसेंबर पर्यंत या स्पर्धा पार पडत आहेत. या स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. इंडियन राऊंड या क्रीडा प्रकारात झालेल्या चुरशीच्या लढतींमधून 17 व 19 वर्षांखालील गटात प्रथम चार क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे.

निवड झालेल्या खेळाडूंमध्ये 17 वर्षांखालील मुले गटात ऋषिराज लायबर (अमरावती), संस्कार खिल्लारे (पुणे), ऋचीर चौधरी (पुणे) आणि प्रतुष मोयर (अमरावती) यांचा समावेश आहे. मुलींच्या याच वयोगटात जान्हवी पवार (पुणे), राशी गर्दे (कोल्हापूर), स्वरांजली बनसुडे (पुणे) आणि श्रावणी पवार (अमरावती) यांनी बाजी मारली. 19 वर्षांखालील मुले गटात प्रथमेश पारते (पुणे),यश पाटील (कोल्हापूर), निखील कडवे (पुणे) आणि स्मित जोरवलकर (नागपूर) यांची निवड झाली, तर मुलींच्या गटात तनुश्री सोनवणे (नाशिक), श्रेया केसकर (कोल्हापूर), केतकी सातपुते (नाशिक) आणि आनंदी लायबर (अमरावती) यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

यशस्वी खेळाडूंना जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती शिल्पा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती वर्षा भाकरे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर यांच्या हस्ते पदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. अनिल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी राजू वढते, सलीम शेख आणि विविध समित्यांमधील कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या स्पर्धांना पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि आरोग्य विभागानेही मोलाचे सहकार्य केले असून, क्रीडा रसिकांनी या स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन क्रीडा विभागातर्फे करण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages