विशेष लेख,
दि.२० :(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):- संत गाडगे बाबांचे विचार स्वच्छता, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक समता आणि व्यसनमुक्ती यांवर आधारित होते, देव दगडात नसून माणसात आहे, असे सांगत त्यांनी 'स्वच्छता हीच सेवा' हा मंत्र दिला, गरिबीत राहून साध्या भाषेत कीर्तनातून समाजाला जागृत केले आणि अंधश्रद्धा व वाईट प्रथा दूर करण्याचा संदेश दिला.तरी देखील आज उच्चशिक्षित असूनही गाडगेबाबा आम्ही आमची बुद्धी गहाण टाकली आहे असे मोठ्या खेदाने म्हणाव लागतं.
.आधुनिक जगात ऐवढी प्रगती होवूनही आम्ही भूतबाधा व्रतवैकल्य सोबतच अंगात देवी देवता येण्याच्या सोंगाला बळी पडतोय तर कधी कुंडलीमध्ये शनी साडेसाती चे भूत डोक्यात घेऊन बसतोय हे किती लज्जास्पद आहे. आज वैराग्यमूर्ती वंदनीय राष्ट्रसंत गाडगेबाबांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी करत असतांना अंधश्रद्धेवर आपल्या ज्वलज्वहाल वाणीतून निर्भीडतेने प्रहार करणारे विचार कोठे गेलेत असा प्रश्न मनी आल्याशिवाय राहात नाही.आधुनिक जगात प्रगतिच्या कितीही बोंबा मारत असलो तरी घडणाऱ्या प्रकारांवरून आजही समाज बुरसटल्या जिर्ण रूढींच्या विळख्यात खितपत पडल्याचे लक्षात येते. आपल्या वाणीतून गाडगेबाबांनी समाजाची डोकी साफ केली तरीही समाज आज कोठे आहे ?
आजकाल बुवा बाबांची संख्या वाढली आहे. अंधश्रद्धेतून अघोरी प्रथा आजही ठाण मांडून बसली आहे. बूवाबाजी करणारे,अघोरी प्रथेला खतपाणी घालणारे आणि अंधश्रद्धा पसरवत जनतेची लूट करणारे समाजमनाचा दांडगा अभ्यास करून सोबतचं मानसशास्त्रही ते कोळून प्यालेले असतात. समाजाची नाडी तपासल्यानेच त्यांच्या भोंदुगिरीला उत येतो व नवशा-गवशांसह हौशेने मंडळी त्यांच्या सत्संगांना हजारो लाखोँच्या घरात जमते. समाजाच्या अस्थिर मनावर भडीमार करीत अघोरी तसेचं बाबा लोक आपलं बस्तान बसण्यात यशस्वी ठरतात. अशा या भ्रामक कल्पनांच्या आहारी जाऊन समाजातील व्यक्तिदेखील स्वतःची सद्सद्विवेकबुद्धी यांच्या चरणी गहाण ठेवतात हीच ती खरी अंधश्रद्धा.
जातीप्रथेविरुद्ध आवाज उठवताना गाडगेबाबा सांगत, ‘बापहो माणसामाणसात फरक कराले तुम्हासले कोणी सांगितले, तुम्हाला कुणी जात विचारली तर माणूस हिच जात सांगा. आपण सर्व एकाच परमेश्वराचे लेकरे आहोत. मग ही शिवाशिव कशाला? बाबाहो, या जगात स्त्री आणि पुरुष अशा दोनच जाती आहेत. हा जातीभेद आपल्या समाजाला देशाला लागलेला एक डाग आहे, कलंक आहे.इतकं सांगून पटवून देवूनही जातीधर्माच्या नावाखाली एकमेकांच्या नावाचं बारसं घातल जातय तर कधी कुटील कारस्थानं रचल्याचा किळसवाणा प्रकार घडतोय.
गाडगेबाबांनी फक्त कीर्तनातूनच शिक्षणाचे महत्त्व सांगितले नाही तर मुलींची व मुलांची वस्तीगृहे बांधली. आज मात्र शिक्षणाचं बाजारीकरण केल्या जातोय अनं शिक्षणसंस्थांना व्यवसायाचं रूप आलयं बाबा.तूम्ही अस्सल मायबोलीतून किर्तने केलीत इथं आमच्या पोरांना मायबोली येईना,इंग्रजी जमेना अशी गत झाल्यानं भविष्याचा अंधकार डोळ्यासमोर पसरतोय बाबा.
गाडगेबाबांनी पंढरपूर येथे खास अस्पृश्यांसाठी धर्मशाळा बांधली. मंदिर मात्र कुठेही उभारले नाही. मुर्तीपूजनाला कायम विरोध करून मानवसेवा सांगीतली तरी आमच्या भगीनींचे व्रतवैकल़्य,दुधाचा अभिषेक, सत्यनारायण फारसे थांबले नाहीत.
साधक अवस्थेत तब्बल १२ वर्षे संपूर्ण महाराष्ट्रात गाडगेबाबांनी भ्रमंती केली. देहाची आसक्ती कसोटीवर घासून घासून बोथट केली.खऱ्या मानवर्धमाचा शोध सुरू केला. १९०५ ते १९५६ अशी तब्बल ५० वर्षे बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आपली हयात खर्ची घातली. बहुजन समाजात पसरलेले सर्व सामाजिक रोग, कर्मकांड, धर्ममार्तंडाचे वर्तन याचे चिंतन केले. सर्व सामाजिक, धार्मिक समस्यांची अगदी शास्त्रीय पद्धतीने चिकित्सा केली आणि एक नवा मानवधर्म, नवा प्रगत समाज निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला,पण हा समाज पूर्णपणे प्रगत का नाही असा प्रश्न उद्भवतो.
आज समाजात नवनविन अवतार जन्म घेत आहेत पण अंगावर चिंध्या पांघरून, हातात खराटा घेऊन गावे साफ करणार्या, रोगराई मरीआईच्या कोपाने होत नसते तर ती तुमच्या अस्वच्छ राहण्याने होत असते अशी स्वच्छतेची शिकवण देणार्या गाडगेबाबांचा अवतार मात्र महाराष्ट्रात जन्म घ्यायला तयार नाही हे आश्चर्यचं. अंधश्रद्धेला लगाम घालण्यासाठी प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणे, हरेक घटनेच्या मुळाचा चौकस नजरेने शोध घेणे, स्वतःवर, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे या विचाराने जयंती साजरी करूया.
कंचन मुरके,अमरावती
Post a Comment
0 Comments