अमरावतीत होणार आंतरराष्ट्रीय 'एआय' परिषद - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, December 18, 2025

अमरावतीत होणार आंतरराष्ट्रीय 'एआय' परिषद

 

अमरावती, दि. १९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): तंत्रज्ञानाच्या युगात मैलाचा दगड ठरणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित 'ICAIISD-2025' या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथे १९ व २० डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. या परिषदेच्या माध्यमातून संशोधन, नवोन्मेष आणि समाजविकासाचा जागतिक संवाद विदर्भाच्या मातीत घडणार आहे.

 

शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता या परिषदेचे उद्घाटन होणार असून, यासाठी देश-विदेशातील नामवंत शास्त्रज्ञ आणि उद्योजकांची मांदियाळी जमणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सचिन मांडवगणे तर प्रमुख अतिथी म्हणून बंगळुरू येथील 'आयआयएसी'चे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. फणिंद्र कुमार यलवर्थी मार्गदर्शन करतील. याशिवाय, न्यूरोसिनॅप्टिकचे समीर सावरकर, सी-कॅम्पचे डॉ. निरंजन जोशी आणि डॉ. रविंद्र केसकर यांसारख्या दिग्गजांची उपस्थिती परिषदेला लाभणार आहे.

 

या परिषदेत प्रामुख्याने शेती, आरोग्य, शिक्षण, स्मार्ट सिटी, सौर ऊर्जा आणि ग्रामीण विकास यांसारख्या १३ महत्त्वाच्या विषयांवर १३ संशोधन प्रबंध सादर केले जातील. या परिषदेचे शोधप्रबंध 'स्प्रिंगर नेचर' सारख्या जागतिक स्तरावरील नामांकित प्रकाशनाद्वारे प्रसिद्ध केले जाणार आहेत.

 

विदर्भातील विद्यार्थी आणि संशोधकांना जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांशी थेट संवाद साधता यावा आणि स्थानिक प्रश्नांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तरे शोधता यावीत, हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे. टाटा मोटर्स आणि टीसीएस सारख्या उद्योगांचे सहकार्य लाभलेली ही परिषद तंत्रज्ञान क्षेत्राला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

 


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages