Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती येथे आंतरराष्ट्रीय एआय परिषद


 संशोधन, नवोन्मेष आणि समाजविकासाचा जागतिक संवाद

 

अमरावती दि.१९ : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद ICAIISD'2025 चे दिनांक 19 व 20 डिसेंबर 2025रोजी आयोजन करण्यात आले असून ही परिषद कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या वेगाने विकसित होत असलेल्या क्षेत्रातील संशोधन, नवोन्मेष आणि समाजोपयोगी तंत्रज्ञान यांचा सखोल आढावा घेणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. आज शुक्रवार, दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता परिषदेचे उद्घाटन होणार असून देश-विदेशातील नामवंत शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग प्रतिनिधी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभणार आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, ऊर्जा, दळणवळण, सुरक्षा, स्मार्ट सिटीज आणि ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये एआयच्या उपयोगामुळे निर्माण होणाऱ्या संधी, आव्हाने आणि भविष्यातील दिशा यावर या परिषदेत सखोल चर्चा होणार आहे. विदर्भासारख्या शैक्षणिकदृष्ट्या प्रगत होत असलेल्या विभागात अशा आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन होणे ही अत्यंत अभिमानाची बाब असून, यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना जागतिक दर्जाच्या संशोधनाशी थेट जोडले जाण्याची संधी मिळणार आहे. संशोधन व उद्योग यांमधील समन्वय वाढवून नव्या कल्पनांना चालना देणारा हा मंच ठरणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.

 

परिषदेच्या उद्घाटन समारंभाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. सचिन मांडवगणे सर, अध्यक्ष नियामक मंडळ, शास. अभि. महा. अम. तसेच प्राध्यापक, केमिकल इंजिनिअरिंग विभाग, व्हीएनआयटी नागपूर हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. फणिंद्र कुमार यलवर्थी, प्राध्यापक, सीडीएस विभाग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू यांची उपस्थिती लाभणार असून ते एआय संशोधनातील जागतिक प्रवाहावर मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख पाहुण्यांमध्ये श्री. समीर सावरकर, सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, न्यूरोसिनॅप्टिक कम्युनिकेशन प्रा. लि., बंगळुरू, डॉ. निरंजन जोशी, प्रोग्राम लीड, सी- कॅम्प, बंगळुरू, डॉ. रविंद्र केसकर, अध्यक्ष एसीएम नागपूर प्रोफेशनल चॅप्टर तसेच सहयोगी प्राध्यापक, संगणक अभियांत्रिकी विभाग, व्हीएनआयटी नागपूर आणि माननीय विभागीय सहसंचालक, तंत्रशिक्षण विभाग, अमरावती विभाग, महाराष्ट्र शासन यांचा समावेश आहे. विविध शैक्षणिक संस्था, संशोधन केंद्रे आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे परिषदेला बहुआयामी स्वरूप प्राप्त होणार आहे.

 

या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या आयोजन समितीने विशेष नियोजन केले असून, जनरल चेअर म्हणून प्राचार्य डॉ. आशिष महल्ले, प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती हे नेतृत्व करत आहेत. कॉन्फरन्स चेअर म्हणून डॉ. राजेश मेटकर, अधिष्ठाता - संशोधन व विकास विभाग, तर ऑर्गनायझिंग चेअर म्हणून डॉ. शंतनु लोही व डॉ. अंजना घुले हे मुख्य समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. प्रा. रवी मांटे हे मुख्य सहसमन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळत असून, संपूर्ण आयोजनात प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सक्रिय योगदान लाभत आहे. या परिषदेत एकूण १३ विविध विषयांवरील संशोधन प्रबंधांचे सादरीकरण होणार असून, एआय ड्रिव्हन सिग्नल अँड इमेज प्रोसेसिंग, रिमोट सेन्सिंग व वेदर फोरकास्टिंग, शेती व ग्रामीण विकास, नवीकरणीय ऊर्जा, रोबोटिक्स व मेकॅट्रॉनिक्स, कम्युनिकेशन्स, शिक्षण, आरोग्य व मानवी विकास, दिव्यांग सक्षमीकरण, इंटरनेट ऑफ थिंग्स, फिनटेक, माहिती सुरक्षा तसेच स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटीज यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. या सादरीकरणांमुळे संशोधनातील नव्या संकल्पनांना व्यासपीठ मिळणार आहे.

 

या आंतरराष्ट्रीय परिषदेला प्रकाशन भागीदार म्हणून 'स्प्रिंगर नेचर' (स्कोपस इनडेक्सड जर्नल) यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले असून, त्यामुळे सादर होणाऱ्या संशोधन प्रबंधांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाणार आहे. तांत्रिक भागीदार म्हणून एसीएम नागपूर प्रोफेशनल चॅप्टर, ज्ञान भागीदार म्हणून सॉफ्ट कम्प्युटिंग रिसर्च सोसायटी, नवी दिल्ली, तसेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस नागपूर, टाटा मोटर्स नागपूर, इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल आणि स्टार्ट-अप समर्थन यांचे सहकार्य परिषदेला लाभले आहे. या सर्व भागीदारीमुळे परिषद अधिक दर्जेदार आणि परिणामकारक ठरणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. प्राचार्य डॉ. आशिष महल्ले यांनी जास्तीत जास्त संशोधक, विद्यार्थी, प्राध्यापक आणि तरुण उद्योजकांनी परिषदेला उपस्थित राहून ज्ञानवृद्धीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच संशोधन प्रबंध सादर करणाऱ्या सर्व संशोधक, विद्यार्थी आणि प्राध्यापकांना त्यांनी शुभेच्छा देत, ही परिषद समाजोपयोगी संशोधन आणि नवोन्मेषाला नवी दिशा देईल, असा विश्वास शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती प्राचार्य डॉ. आशिष महल्ले  यांनी व्यक्त केला आहे.


Post a Comment

0 Comments