दि.१० शिरसगाव कसबा / चांदूरबाजार:
अचलपूर तालुक्यातील शिरसगाव कसबा येथील ग्रामपंचायतीविरोधात चांदूरबाजार पंचायत समितीकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असतानाही, गटविकास अधिकारी (BDO) यांच्याकडून आजवर कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेल्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून (BDO) येथील ग्रामसेवकाची पाठराखण होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. "मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर" या वाक्प्रचाराची चर्चा पंचक्रोशीत रंगू लागली आहे.ग्रामपंचायतीच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रमुख तक्रारी आणि समस्या:
येथील सीसीटीव्ही प्रकल्प बंद अवस्थेत आहे.
अंगणवाडीतील वीज समस्या आणि साहित्य खरेदीबाबत तक्रारी आहेत.
घनकचरा प्रकल्प आणि साफसफाई विषयी अनेक तक्रारी प्रलंबित आहेत.
याबाबत वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध होऊनही कारवाई झालेली नाही.
पंचायत समिती ही ग्रामपंचायतीच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन, नियंत्रण आणि शासकीय योजना राबवण्यास मदत करते. परंतु, शिरसगाव कसब्यात गटविकास अधिकारी हे ग्रामसेवकाला फोन करून सूचना देतात, ग्रामसेवक फक्त 'हो' म्हणून कामाकडे कानाडोळा करीत असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे गाव विकासाला फटका बसत असल्याची ओरड होत आहे.कामाचे नियोजन शून्य असून, जमिनीस्तरावर कामे निष्क्रिय असल्याचे दिसून येत आहे.
गटविकास अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण:
याबाबत गटविकास अधिकारी, पं. स. चांदुर बाजार,डॉ. नीलेश वानखडे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. "विषयास अनुसरून ग्रा.पं. ला स्मरणपत्र देऊ. मासिक सभेत सदर विषय घेतलेत की नाहीत हे तपासून पुन्हा शि. कसबा ग्रा.पं. ला पत्रव्यवहार करून तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात येईल." तालुका पातळीवर योग्य नियंत्रण व समन्वय नसल्यास गावाचा विकास खुंटतो, अशी खंतही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Post a Comment
0 Comments