गैरव्यवहारावर कठोर कारवाई!
अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज सध्या सुरळीत आणि प्रभावीपणे सुरू असल्याची माहिती महामंडळाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. महामंडळाच्या महत्त्वाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना नियमितपणे मिळत आहे.
नवीन 'पात्रता प्रमाणपत्र' (LOI) देण्याची प्रक्रिया तांत्रिक कारणास्तव तात्पुरती स्थगित असली तरी, लाभार्थ्यांना दिला जाणारा व्याज परतावा कोणत्याही अडथळ्याविना नियमितपणे वितरित केला जात आहे. सप्टेंबर 2025 पर्यंतच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात व्याज परताव्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. महामंडळाचे कामकाज थांबल्याच्या अफवांवर महामंडळाने हे स्पष्टीकरण दिले आहे.
महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी माहिती दिली आहे की, पात्रता प्रमाणपत्र (LOI) च्या प्रक्रियेतील तांत्रिक सुधारणा लवकरच पूर्ण होत आहेत. त्यामुळे शक्य तितक्या लवकर नवीन 'LOI' देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.
नाशिक आणि अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यांमध्ये एजंट आणि ट्रॅक्टर एजन्सींनी संगनमत करून एकाच मोबाईल क्रमांकावर अनेक प्रकरणे दाखल केल्याचे आणि एजंटने परताव्याची रक्कम स्वतःच्या खात्यावर घेतल्याचे निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेत, व्यवस्थापकीय संचालक श्री. देशमुख यांच्या निर्देशानुसार अहिल्यानगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.
गैरव्यवहार टाळण्यासाठी महामंडळातर्फे 'Account Validation' प्रणाली लागू करण्यात येत आहे. एजंटमार्फत अर्ज दाखल केलेल्या आणि सध्या तात्पुरत्या स्वरुपात 'Block' केलेल्या लाभार्थ्यांनी त्यांच्या मूळ कागदपत्रांसह जिल्हा समन्वयकांना संपर्क साधण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे. जिल्हा समन्वयकांचा संपर्क क्रमांक www.udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यापुढे 'नागरी सुविधा केंद्र' वगळता, अन्य प्रकरणांसाठी एकच मोबाईल क्रमांक/लॉगिन वापरून केवळ एकच प्रकरण दाखल करता येईल, अशी सुधारणा प्रस्तावित आहे.
Post a Comment
0 Comments