दि. २६ शिरसगाव कसबा :
चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा परिसरात विजपंपाचे केबल चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून, चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दिवसा रेकी करून रात्रीच्या अंधारात चोऱ्या केल्या जात आहेत. . शेतातून विजेच्या केबलसह अन्य साहित्य चोरीला जाण्याच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली असून, यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे हैराण झाला आहे. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस प्रशासनासमोर चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
१९ आणि २१ नोव्हेंबरच्या रात्री मौजे पाळा शेतशिवारातील अंकित प्रदीप दाभाडे, नाना गायकवाड, अ. कलीम शे. करीम, प्रशांत सु. गुर्जर आणि प्रदीप उ. कुन्हाडे यांच्या शेतातील ट्यूबवेल व विहिरीतील ३८० फूट केबल चोरट्यांनी लंपास केले. तसेच, अशोक गं. गुर्जर, शंकर तु. राजस, विश्वास रा. केदार यांचे शेतातील मोटार स्टार्टर, पितळी स्प्रिंकलर नौझल, लोखंडी पाईप, प्लास्टिक ठिबक नळ्या अशा शेतीपयोगी वस्तू सुद्धा चोरून नेण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि पोलिसांची भूमिका:
या घटनेनंतर स्थानिक पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवून कलम ३०३ (२) अन्वये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही अशाच प्रकारच्या अनेक घटना घडल्या असूनही तपास लागलेला नाही. चोरीनंतर त्याच परिसरात केबल जाळून त्यातील कॉपरचा तार काढून पुरावा नष्ट केला जातो.
शिरसगाव कसबा ठाण्याच्या हद्दीत केबल चोरीच्या अनेक घटना घडल्या असूनही पोलिसांकडून ठोस कारवाई केल्या जात नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत शेतकऱ्यांचा आरोप आहे की, तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस प्रशासन केबल चोरीच्या घटनेकडे 'एक छोटी घटना' या नजरेने पाहते आणि त्याला महत्त्व दिले जात नाही. परिणामी, चोरट्यांचा आत्मविश्वास वाढून चोरीच्या घटना वाढत आहेत. मागील पाच वर्षांत ठोस कारवाई न झाल्याने आता अनेक शेतकरी तक्रार देणेही बंद केले आहेत. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
तपासाची मागणी:
अनेक चोऱ्यांमधून थोडा थोडा कॉपर तार जमा करून तो बाजारात विकला जातो. त्यामुळे आसपासच्या मोठ्या बाजारपेठेतील भंगार खरेदी करणाऱ्या दुकानांवर पाळत ठेवून चौकशी केल्यास चोरीचे धागेदोरे मिळू शकतात, असा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
Post a Comment
0 Comments