मेळघाटातील दोन माता मृत्यूंच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने दिले स्पष्टीकरण - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, November 14, 2025

मेळघाटातील दोन माता मृत्यूंच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने दिले स्पष्टीकरण


अमरावती, दि. १५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): मेळघाट क्षेत्रात सात दिवसांत झालेल्या दोन माता मृत्यूच्या घटनांवरून आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर उठलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने सविस्तर स्पष्टीकरण जारी केले आहे. या स्पष्टीकरणातून, आरोग्य विभागाने माता वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र अति जोखमीच्या मातांना वाचवण्याच्या प्रयत्नात नातेवाईकांचा असहकार आणि संदर्भ सेवा नाकारण्याचीवृत्ती मोठी अडचण ठरल्याचे सांगितले आहे.

सिकलसेल ग्रस्त मातेच्या बाबतीत नातेवाईकांचा असहकार: पहिली घटना वनिता गाजा धिक्कार (वय 24) या सिकलसेलग्रस्त मातेची आहे, जी अति जोखमीची म्हणून नोंदवलेली होती. संपूर्ण गरोदरकाळात तिला वारंवार समुपदेशन करण्यात आले. एकूण पाच वेळा आरोग्य तपासणी केली गेली आणि तिला जुलै 2025 मध्ये रक्त संक्रमणाकरिता उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर येथे संदर्भही देण्यात आला. मात्र, ती जुलैमध्ये कोणालाही  न सांगता घरी निघून गेली. आरोग्य विभागाने तत्परता दाखवून तिला शोधले आणि भरती होण्याचा सल्ला दिला, पण तिने नकार दिला. प्रसूती कळा सुरू झाल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र हतरू येथे आणले गेले. ती ॲनिमिक असल्याने पुन्हा अचलपूर येथे संदर्भ दिला गेला, परंतु नातेवाईकांनी त्यावेळीही परत जाण्यास नकार दिला. प्रसूतीनंतरही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याविरुद्ध माता घरी गेली आणि अखेर दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी घरी मृत पावली.

दुसरी घटना राणी प्रेम सावरकर या एच बी एस एजी रिएक्टिव अति जोखमीच्या मातेची आहे. 15 मे 2025 पासून नोंदणी झाल्यानंतर तिच्या एकूण पाच तपासण्या झाल्या आणि तिला सर्व सेवा तसेच सोनोग्राफीसाठी संदर्भ देण्यात आलेला होता. 17 सप्टेंबर 2025 रोजी प्रसव कळा सुरु झाल्यावर आरोग्य विभागाने तातडीने 108 ॲम्बुलन्सची व्यवस्था केली आणि तिला प्राथमिक आरोग्य केंद्र काटकुंभ येथून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात संदर्भित केले. तिथे तिने एका मुलीला जन्म दिला. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी पोट दुखत असताना, उपचारादरम्यान उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे तिचा मृत्यू झाला.

मेळघाट क्षेत्रामध्ये प्रत्येक माता मृत्यूचा सखोल अभ्यास केला जातो. मेळघाट क्षेत्रात 11 प्राथमिक आरोग्य केंद्र, एक उपजिल्हा रुग्णालय व दोन ग्रामीण रुग्णालये असूनही, अति जोखमीच्या मातांना जिल्हा रुग्णालय किंवा त्याहून वरिष्ठ स्तरावर संदर्भ सेवा देणे आवश्यक असते. अशावेळी बरेचदा गरोदर मातेचे नातेवाईक संदर्भ स्वीकारण्यास नकार देतात, भरती झाल्यानंतर अर्धवट औषधोपचार घेऊन घरी जातात किंवा अगदी शेवटच्या क्षणाला दवाखान्यात येण्यास तयार होतात. या अडचणींवर मात करूनही आरोग्य यंत्रणा काम करत आहे. या दोन्ही घटनांमध्ये जिल्हास्तरीय चौकशी समितीच्या निदर्शनास आलेल्या त्रुटींबाबत संबंधितांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात आली असून, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages