अमरावती, दि. 4 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात हातभट्टी दारू विरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत भरारी पथकाने दि. 2 व 3 ऑक्टोबर रोजी दोन मोठे छापे टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
धारवाडा, ता. तिवसा शिवारात दि. 2 ऑक्टोबर रोजी वर्धा नदीकाठी हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्या ठिकाणावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात जितेश रामू राठोड (वय 39, रा. जुनी शिदवाडी, तिवसा) या आरोपीकडून तब्बल 292 लिटर गावठी हातभट्टी दारू आणि3280 किलो मोहा सडवा असा एकूण 1 लाख 55 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मोझरी येथे दि. 3 ऑक्टोबर रोजी भरारी पथकाने मोझरी शिवारात आड नदीकाठी कारवाई केली. यात भीमराव खाटसरे (रा. मोझरी) आणि राजेंद्र पुंडलिकराव मुंढरे (वय 55, रा. अनकवाडी) यांच्याकडून 57 लिटर हातभट्टी दारू आणि 2725 किलो मोहा सडवा जप्त केला. याची किंमत 72 हजार रुपये आहे.
या दोन्ही कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने 2 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1941 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही प्रभारी निरीक्षक एस.पी. वायाळ, प्रभारी दुय्यम निरीक्षक आकाश जाधव यांच्या नेतृत्वात पार पाडली. या कारवाईत जवान एस. एस. पेंढारकर, आर.पी. मोकळकर, पी. आर. भोरे, के. एम. मातकर, महिला जवान व्ही. बी. पारखी, डी. डी. मानकर यांनी चा सहभाग घेतला.
Post a Comment
0 Comments