रा. सू. गवई स्मारकाचे उद्घाटन ३० ऑक्टोबरला नियोजित - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, October 10, 2025

रा. सू. गवई स्मारकाचे उद्घाटन ३० ऑक्टोबरला नियोजित


उद्घाटनाच्या अनुषंगाने कार्यवाही पूर्ण करावीत – जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. ११(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : दादासाहेब उपाख्य रा. सू. गवई यांच्या स्मारकाचे उद्घाटन दि. 30 ऑक्टोबर रोजी नियोजित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने सर्व विभागांनी परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, तसेच वीज, पाणी आणि स्वच्छतेची कामे प्राधान्याने करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

रा. सू. गवई स्मारकाच्या उद्घाटनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, मुख्य अभियंता गिरीश जोशी, कार्यकारी अभियंता प्रतिक गिरी यांच्यासह आदी अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी बांधकामाच्या अनुषंगाने आढावा घेतला. बांधकाम पूर्ण झालेले असले तरी उद्घाटनाच्या अनुषंगाने कोणतेही काम अपूर्ण राहू नये, तसेच सर्व परवानगी आणि ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. स्मारकाच्या पाणी पुरवठा, वीज आणि स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेने कार्यवाही करावी, तसेच स्वच्छतेसाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. स्मारकाच्या प्रवेशद्वारावरून विजेची तार गेल्याने ही वाहिनी भूमिगत करण्याबाबत शक्यता पडताळून पाहावी. तसेच संपूर्ण स्मारकामधील वीज पुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला असल्याची खात्री करावी.

स्मारकाच्या ठिकाणी पाणीपुरवठा व्यवस्था करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. जोडणीसाठी तातडीने प्रक्रिया करावी. स्मारकाची सुरक्षा ही महत्वाची आहे. यासाठी महापालिकेने सुरक्षा कर्मी नेमावेत. अग्निशमन यंत्रणा महत्वाची असून त्यांचेही ना हरकत प्रमाणपत्र तातडीने घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. स्मारकाच्या निमित्ताने नागरिकांसाठी सुविधा झाली असून अंतर्गत व्यवस्था राखण्यासाठी कंत्राटीतत्त्वावर तीन कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच स्मारकाच्या देखभाल दुरूस्तीसाठी निधीची तरतूद करण्यात येणार आहे.

रा. सू. गवई स्मारकाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे उद्घाटन कार्यक्रमासाठी लागणाऱ्या सर्व परवानगी आणि ना हरकत घेण्यात यावी. तसेच उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या सूचना श्री. येरेकर यांनी दिल्या.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages