Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

नेहरु मैदानावरील कचरा तात्काळ हटवा; जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांचे आदेश

अमरावती, दि. १५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागातील नेहरु मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणि पर्यावरणाच्या गंभीर समस्येवर जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आशीष येरेकर यांनी काल तातडीचे आदेश जारी करून, या परिसरातील संपूर्ण कचरा फक्त 48 तासांच्या आत उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबत जारी केलेल्या आदेशानुसार, शहरातील शिट नंबर 55 ए, प्लॉट नंबर 1/1 (नेहरु मैदान) या 13 हजार 627.81 चौ. मी. क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, साथीचे रोग पसरण्याची भीती नाकारता येत नाही.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही (MPCB) या कचऱ्यामुळे प्रदूषण होत असल्याचे कळविल्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या कलम 30 नुसार नेहरु मैदानावरील सर्व कचरा (केरकचरा) त्वरित उचलण्याचे निर्देश दिले आहे. कचरा उचलल्यानंतर त्वरित त्या ठिकाणी योग्य निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता मोहीम राबवावी. कचरा उचलण्याची संपूर्ण प्रक्रिया पुढील ४८ तासांत पूर्ण करावी. यापुढे या परिसरात पुन्हा कचरा साठणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.

या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.


Tags

Post a Comment

0 Comments