अमरावती, दि. 17 (ग्रामीण उदय प्रतिनिधी ) : माहितीचा अधिकार अधिनियम 2005 लागू होऊन अल्पावधीतच लोकाभिमुख ठरला असून या कायद्याच्या व्यापक प्रसार व प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने विशेष उपक्रम आखले आहेत. शासनाच्या निर्णयानुसार दरवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस राज्यात “माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा केला जातो.
यावर्षी 28 सप्टेंबर हा दिवस रविवार असल्याने हा दिवस 29 सप्टेंबर 2025 रोजी साजरा करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. या दिवशी शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत सर्व शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रश्नमंजूषा, चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यानमाला आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वराज्य संस्था व विविध समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने भित्तीपत्रक स्पर्धा, निबंध व वक्तृत्व स्पर्धा तसेच चर्चासत्रांचे आयोजन होणार आहे.
या उपक्रमांसाठी आवश्यक पारितोषिकांची व्यवस्था लायन्स क्लब, रोटरी क्लब यांसारख्या संस्थांच्या मदतीने केली जाणार आहे. समाजात माहितीच्या अधिकाराबाबत व्यापक जनजागृती व्हावी आणि कायद्याची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी, हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधितांना 29 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या कार्यक्रमांचा अहवाल सादर करण्याचे आवाहन केले आहे.
Post a Comment
0 Comments