Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

जिल्ह्यात "श्रीगणेशा आरोग्याचा" उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; 308 आरोग्य शिबिरातून 16 हजार 219 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

          583 नागरिकांनी केले रक्तदान*

 अमरावती, दि. 10 : गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने आणि विविध आरोग्य संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे हजारो नागरिकांना मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळाला.

            या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील गणेश मंडळांच्या ठिकाणी आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले. हा विशेष उपक्रम जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, अधीक्षक डॉ. निलेश खटके, धर्मदाय सह आयुक्त दीपक खोचे, धर्मदाय उपायुक्त राजेश इंगोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक आसोले, सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे अध्यक्ष डॉ. श्याम गावंडे, कर्मचारी पवन गुल्हाने व मंगेश बांबटकर यांच्या प्रत्यक्ष सहभागाने प्रभावीपणे राबविण्यात आला.

            या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात एकूण 308 आरोग्य शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमधून 16 हजार 219 नागरिकांना आरोग्य तपासणी व उपचाराचा लाभ मिळाला. या शिबिरात 7 हजार 915 पुरुष, 7 हजार 380 महिला व 924 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या उपक्रमादरम्यान 583 नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक उत्तरदायित्वाचे सुंदर उदाहरण दिले.

यासोबतच विविध सामाजिक संस्थांनी देखील आरोग्य विषयक जनजागृतीसाठी सहभाग नोंदवला. ‘अनुलोम’ संस्थेने जिल्ह्यातील 14 तालुक्यातील ग्रामीण भागात 130 गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन 9,100 नागरिकांमध्ये आरोग्य विषयक बाबी संदर्भात जनजागृती केली.

अशाप्रकारे "श्रीगणेशा आरोग्याचा" या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून एकूण 438 आरोग्य उपक्रम व जनजागृती कार्यक्रम आयोजित करून 25,319 नागरिकांपर्यंत आरोग्य विषयक जनजागृती पोहोचविण्यात आली, तर यापैकी 16,219 नागरिकांना प्रत्यक्ष आरोग्य सेवेचा लाभ देण्यात आला.

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला जिल्ह्यातील नागरिक व सामाजिक संस्थांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा आरोग्य जनजागृती व सेवा क्षेत्रातील एक उल्लेखनीय बाब ठरली आहे. समाजातील गोर-गरीब नागरिकांना व रुग्णांना आरोग्य तपासणी व वैद्यकीय उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत, या उदात्त हेतूने हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला.


Post a Comment

0 Comments