अमरावती, दि. ७ (ग्रामीण उदय प्रतिनिधी): अमरावती ग्रामीण पोलिसांनी पाळा, ता. मोर्शी येथील कुख्यात हातभट्टीचालक शेरु शहा करीम शहा याला महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार एमपीडीए कायद्याखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे.
शेरु शहा करीम शहा हा अनेक वर्षांपासून पाळा आणि परिसरात गावठी हातभट्टीची दारू विकण्याचे अवैध धंदे चालवत होता. त्याच्या या व्यवसायामुळे परिसरातील तरुण मुले व्यसनाधीन झाली होती, ज्यामुळे भांडण-तंटे आणि महिलांची छेडछाड यांसारखे प्रकार वाढले होते. त्याच्यावर अनेकदा कारवाई करूनही त्याने अवैध व्यवसाय सुरूच ठेवला होता. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे सादर केला. जिल्हादंडाधिकारी आशिष येरेकर यांनी सर्व कायदेशीर बाबी तपासल्यानंतर शेरु शहा करीम शहा याला एक वर्षासाठी अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश ३० जुलै २०२५ रोजी दिला. या आदेशानुसार त्याला त्याच दिवशी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे, सहायक पोलिस निरीक्षक सारंग बोंम्पीलवार, पोलिस उपनिरीक्षक विष्णुपंत राठोड, पोहेकॉ अमोल देशमुख आणि पोलिस स्टेशन मोर्शीचे ठाणेदार पोलिस निरीक्षक सुरज बोंडे, नितीन देशमुख, पोहेकॉ योगेश सांभारे यांनी पार पाडली.
अमरावती ग्रामीण जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गंभीर गुन्हे करणाऱ्या गुंडांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई सुरूच राहील, असे पोलिसांनी सांगितले आहे.
Post a Comment
0 Comments