सात संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल,आरोपी पसार
अमरावती दि. ४ (ग्रामीण उदय प्रतिनिधी ): अचलपूर शहरातील विठ्ठलवाडी परिसरात नायरा पेट्रोल पंपासमोर नीरज अर्बन को-ऑपरेटिव्ह निधी बेकायदेशीर आर्थिक संस्थेच्या माध्यमातून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी परतवाडा येथील क्रेडिट मॅनेजर रंजना वसंतराव बुरंगे (वय ५१ वर्षे) यांच्या तक्रारीवरून अचलपूर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीरज अर्बन को-ऑप निधी लिमिटेड बँकेच्या संस्थेचे संचालन युवराज भगवान गिन्हे (रा. अमरावती), त्यांची पत्नी निकिता गि-हे, आकाश प्रमोद बोबडे (आसेगाव), प्रितम जनार्धन पडोळे (रा. लाडकी), दीपक बाबाराव इंगोले (रा. बडनेरा), तानाजी शरदराव ठोमर (रा. बिड) आणि आकाश राऊत असे या एकूण सात संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संस्थेने खोटया आश्वासनांचा दावा करून नागरिकांना आकर्षक योजनांचे आमिष दाखवले. जनतेला फसवून त्यांनी डेली डिपॉझिट, सेव्हिंग अकाउंट, आरडी आणि फिक्स डिपॉझिट यासारख्या विविध योजनांतून लोकांकडून गुंतवणूक करून घेतली. एकूण २६६ खातेदारांकडून ४०,०९,२४६ ची फसवणूक करण्यात आली. या सर्व संचालकांनी गुन्हा केल्यानंतर कार्यरत असलेल्या बिल्डिंगवरील संस्थेच्या नावाचे पोस्टर गेल्या काही महिन्यापुर्वी काढून निधी संस्था बंद करून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ठगलेल्या रकमेचा तपशील
- डेली डिपॉझिट : १३,०२,५५०
- फिक्स डिपॉझिट : २५,०५,०००
- आरडी (रेकरींग डिपॉझिट) : ३४,७००
- सेव्हिंग अकाउंट : १,३२,४१४
- इतर रकम : २२,७५०
दि. ८ ऑक्टोबर २०२४ ला मी निरज बँकेत डेली आरडीचे खाते उघडले होते. दररोज संध्याकाळी एजंटकडे पैसे भरत होतो. मार्च २०२६ पर्यंत मी पैसे भरले. ११८०० रुपये जमा झालेले होते. बैंक बंद झाली तर आम्हाला त्याची माहितीसुद्धा नव्हती. ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही सदर बँकेच्या परतवाडा शाखेत गेलो तर त्यांनी आम्हाला पैसे देण्यास नकार दिला. आमचा त्या बँकेची काही संबंध नाही असे सांगितले. मग आम्ही अचलपूर पोलीस स्टेशनमध्ये गेलो त्या ठिकाणी आमच्याकडून लिहून घेण्यात आले.
- संजय लहाने, कुलस्वामिनी कलेक्शन, अचलपूर.
नीरज बँक शाखेत माझे डेली आरडीचे खाते होते. एजंट मार्फत पैसे जमा केले. जेव्हा पैसे काढायचे म्हटले त्याच वेळी बँकेचे काम सुरू आहे असे अचलपूर येथील शाखा मॅनेजर अग्रवाल यांनी सांगितले. काही दिवसांनी बँक शाखा बंद झाली. माझे दहा हजार रुपये जमा होते. मला माझे पैसे परत मिळावे.
- रुपेश मिश्रा, अचलपूर.
Post a Comment
0 Comments