कृषी पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 3, 2025

कृषी पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन


 अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै

          अमरावती, दि. ४  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या वतीने सन २०२४ साठी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शेतकरी आणि संस्थांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यासाठी पात्र शेतकरी आणि संस्थांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

          पुरस्कार आणि त्याचे स्वरूप:

 यामध्ये 'डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार- ३  लक्ष रुपये, 'वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार', 'जिजामाता कृषिभूषण पुरस्कार', 'कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार' प्रत्येकी २  लक्ष रुपये, 'वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार' १  लक्ष २०  हजार रुपये, 'उद्यान पंडित पुरस्कार' १  लक्ष रुपये, 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार' (सर्वसाधारण व आदिवासी गट) ४४  हजार रुपये तसेच 'युवा शेतकरी पुरस्कार' (वयोमर्यादा कमाल ४०  वर्षे) १  लक्ष २० हजार रुपये असे पुरस्कारही प्रदान केले जातील. प्रत्येक पुरस्कारात रोख रकमेसोबत स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि सपत्नीक सत्कार करण्यात येईल.

          अटी व शर्ती:

अर्जदारांकडे स्वतःच्या नावावर शेती असणे, शेती हा कुटुंबाचा मुख्य व्यवसाय असणे, कृषी क्षेत्रात अति-उल्लेखनीय कार्य करून अधिक नफा मिळवलेला असणे या मुख्य अटी आहेत. सेंद्रिय शेतीसाठी पीजीएस प्रमाणीकरण आवश्यक आहे. तसेच, जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सन २०२४  चा चारित्र्य पडताळणीचा दाखला आणि 7/12, 8-अ सादर करणे बंधनकारक आहे.

          अर्जाची अंतिम मुदत ३१  जुलै २०२५  पर्यंत आहे. इच्छुकांनी याची नोंद घेऊन संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तीन प्रतींमध्ये अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages