फळपीक विमा योजनेसाठी 6 जुलैपर्यंत नोंदणीची संधी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 3, 2025

फळपीक विमा योजनेसाठी 6 जुलैपर्यंत नोंदणीची संधी


       अमरावती, दि. ४ (ग्रामीण उदय प्रतिनिधी): जिल्ह्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार २०२५-२६  अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम मुदत ६  जुलै २०२५  पर्यंत आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड किंवा रोगांमुळे फळपिकांचे होणारे मोठे नुकसान टाळण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार आहे. जिल्ह्यासाठी भारतीय विमा कंपनीची निवड झाली असून, राज्य शासनाने या योजनेस दोन वर्षांसाठी (२०२४-२५ आणि २०२५-२६) मान्यता दिली आहे.

या योजनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य टिकून राहील आणि त्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन मिळेल. संत्रा, मोसंबी, लिंबू, पेरू, डाळिंब आणि सीताफळ या अधिसूचित फळपिकांसाठी ही योजना लागू आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (AGRISTACK Farmer ID) आणि ई-पीक पाहणीमध्ये नोंदणी अनिवार्य आहे.

पेरू, लिंबू, संत्रा, मोसंबीसाठी आधार संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींमुळे ३  ते ६ जुलै २०२५  अशी ४  दिवसांची विशेष मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे, इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या बँक शाखेत किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन विहित मुदतीत विमा हप्ता भरून योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी तालुका किंवा जिल्हा कृषी कार्यालयांशी संपर्क साधावा.

****

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages