अमरावती, दि. १९ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे लाभ देण्यात येत आहे. मात्र आधार प्रमाणीकरण झालेले नसल्याने पेमेंट फेल होत असल्याने लाभ देण्यात अडचण येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३२ हजार २७६ लाभार्थ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
आजपर्यंत जिल्ह्यात ३२ हजार २७६ लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही. ज्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही आणि ज्यांची डीबीटी पोर्टलवर नोंदणी झालेली नाही, अशा लाभार्थ्यांनी अद्ययावत आधार कार्ड आणि बँकेच्या पासबुकच्या प्रतीसह संजय गांधी योजना विभाग, तहसील कार्यालय येथे उपस्थित राहावे. जिल्ह्यात संजय गांधी योजना आणि श्रावणबाळ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे वितरण करण्यात येते. शासनाने डिसेंबर २०२४ पासून डीबीटीद्वारे अनुदानाचे वितरण सुरू केले आहे. जून २०२५ चे अनुदान देखील वितरित करण्यात आले आहे. डीबीटी पोर्टलवर लाभार्थ्यांची नोंदणी आणि अनुदान वितरणामध्ये जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.
जिल्ह्यात संजय गांधी योजनेंतर्गत एकूण ९१,९७२ लाभार्थी आहेत. त्यापैकी ८८,९५५ लाभार्थ्यांची डीबीटी पोर्टलवर नोंदणी झाली आहे. यापैकी ७९,२७५ लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. अद्यापही ९,६८० लाभार्थींचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे. जून 2025 मध्ये 71,661 लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तर 5,395 लाभार्थ्यांचे पेमेंट अयशस्वी झाले आहे. असे यात एकूण 77,056 लाभार्थी आहेत.
श्रावणबाळ योजनेत जिल्ह्यात एकूण 1,74,290 लाभार्थी आहेत. यापैकी 1,63,545 लाभार्थ्यांची डीबीटी पोर्टलवर नोंदणी झाली आहे. यात 1,40,949 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. अद्याप 22,598 लाभार्थींचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. जून 2025 मध्ये 1,28,751 लाभार्थ्यांना अनुदान मिळाले आहे, तर 9,106 लाभार्थ्यांचे पेमेंट अयशस्वी झाले आहे. यात एकूण 1,37,857 लाभार्थी आहे.
डीबीटी पोर्टलवर पेमेंट अयशस्वी होण्यामध्ये मुख्य कारण आधार कार्ड बँक खाते क्रमांकाशी आणि एनसीपीआयशी लिंक नसणे किंवा आधार क्रमांक मॅप नसणे, आधार आयआयएनशी मॅप नसणे, लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँक खाते क्रमांक बरोबर लिंक नसणे यामुळे पेमेंट अयशस्वी होत आहे. यामुळे लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन आपले आधार कार्ड एनपीसीआय आणि बँक खात्याशी लिंक करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.
Post a Comment
0 Comments