Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी १५ जूनपर्यंत विशेष अभियान


अमरावती , दि. १०  (कार्यालय प्रतिनिधी ): संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांना अद्यापही या योजनांचे अनुदान मिळालेले नाही, त्यांच्यासाठी जिल्ह्यात विशेष अभियान राबविले जात आहे. दि. ९  ते १५ जून २०२५ या कालावधीत तालुकास्तरावर हे अभियान आयोजित करण्यात आले आहे.

 जिल्ह्यात २०१८ पासून डी.बी.टी. (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण सुरु झाले आहे. त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्णय घेतला आहे की, ५ मार्च २०२५ पासून डी.बी.टी. पोर्टलवर नोंदणीकृत आणि आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच अनुदान दिले जाईल. पारंपारिक बीम्स पद्धतीने अर्थसहाय्य वितरण सध्या थांबविण्यात आले आहे.

आतापर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत डी.बी.टी. द्वारे २ लाख १४ हजार ९१३ लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात आले आहे.

 डी.बी.टी. पोर्टलवर नोंदणीमध्ये अमरावती जिल्हा प्रथम क्रमांकावर असून अनुदान वितरणातही जिल्हा अग्रेसर आहे. लाभार्थ्यांचे आधार लिंक खाते अधिक असल्याने त्यांना अनुदान लवकर मिळत आहे.

तरी ज्या लाभार्थ्यांचे आधार लिंक झालेले खाते अद्यापही नाहीत, किंवा ज्यांचे ९५-इनऍक्टिव्ह आधार (आधार कार्ड बँक खाते क्रमांक किंवा NPCI बँक लिंक नसल्यामुळे) आणि ९६-आधार मॅपिंग डझ नॉट एक्झिस्ट (आधार नंबर IIN ला लिंक नाही) अशा लाभार्थ्यांनी तातडीने आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे.

ज्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही आणि ज्यांचे आधार व्हॅलिडेट झालेले नाहीत, अशा लाभार्थ्यांनी या विशेष अभियानात आपले अपडेटेड आधार कार्ड आणि बँक पासबुकची प्रत घेऊन संजय गांधी योजना विभाग, तहसील कार्यालय येथे उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments