Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

जिल्ह्यात 'धरती आबा जनभागीदारी अभियान' सुरु: आदिवासींच्या विकासासाठी विशेष शिबिर


अमरावती, दि. १९  (ग्रामीण उदय प्रतिनिधी): आदिवासी आणि आदिम जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारच्या 'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DA-JGUA)' आणि 'प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान (PM JANMAN)' अंतर्गत जिल्ह्यात विशेष 'धरती आबा जनभागीदारी अभियान' सुरू करण्यात आले आहे. दि. १८ जून २०२५ पासून  या अभियानाला सुरवात झाली असून हे अभियान ३०  जून २०२५ पर्यंत राबविण्यात येणार आहे. या कालावधीत जनजागृती आणि लाभ वितरण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

            नागरिकांना मोठ्या संख्येने शिबिरांना उपस्थित राहून या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

 

   जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे.  जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच या अभियानात समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील सर्व  तालुक्यांतील तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि अन्य तालुकास्तरीय यंत्रणांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ९  तालुक्यातील ३२१  गावांमध्ये प्रत्येक गावात प्रभावीपणे जनजागृती करून लाभ वितरणाचे कॅम्प आयोजित करण्याचे आणि अभियान उत्तमपणे राबवण्याचे निर्देश श्री. येरेकर यांनी दिले.

या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. यामध्ये आधारकार्ड नोंदणी, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, जॉब कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, किसान सन्मान निधी इत्यादींचे वितरण करण्यात येणार आहे. कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही याची खात्री स्थानिक प्रशासनामार्फत केली जाईल. यासाठी विविध विभागांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणीचे प्रकल्प अधिकारी राहुल ठोंबरे हे या अभियानाचे कामकाज पाहत आहेत.


Post a Comment

0 Comments