Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना करणार


-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
*पारधी पॅकेज अंतर्गत लाभाचे वाटप

अमरावती, दि.  २ जून २०२५ (कार्यालय प्रतिनिधि) : पारधी समाज हा आजही मागासलेलाच आहे. त्यांना आपल्या अधिकाराची अद्यापही जाणीव झालेली नाही. गेल्या कालावधीत राज्य सरकारने राबविलेल्या विविध उपक्रमामुळे जातीच्या प्रमाणपत्रासह शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे. यापुढेही शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात पारधी समाजामध्ये कार्य करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००  व्या जयंतीनिमित्त आज जिल्हा नियोजन सभागृहात धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने पारधी पॅकेज अंतर्गत लाभार्थ्यांना विविध योजनांचे वाटप पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रतापदादा अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, चंदू यावलकर, प्रवीण पोटे पाटील, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अप्पर आदिवासी आयुक्त जितेंद्र चौधरी, प्रकल्प अधिकारी प्रिया म्हाडदळकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००  व्या जयंतीनिमित्त समाजातील विविध घटकांचा विकास करण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. पारधी विकास कार्यक्रमांतर्गत रोजगाराभिमूख योजना राबविण्यात येत आहे. आज प्रामुख्याने व्यवसाय आणि रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. रोजगारनिर्मितीसोबतच शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार मिळवण्यासाठी प्रशिक्षित कामगार तयार करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येईल.

केंद्र शासनाने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक जातीची माहिती घेण्यासोबतच त्यांचे सामाजिक सर्वेक्षणही करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक समाजाची परिस्थिती समजणार असून वस्तुस्थिती समोर येणार आहे. त्यानुसारच प्रत्येक समाजाला विकसित करण्यासाठी धोरण ठरवण्यात येईल. पारधी समाजाला त्यांच्या वस्त्यांमध्येच लाभ मिळावा, यासाठी त्यांचे सर्वेक्षण करावे. वस्त्यांच्या ठिकाणी महाराजस्व अभियान अंतर्गत शिबिर आयोजित करण्यात यावे. या ठिकाणी संपूर्ण योजनांची माहिती द्यावी. पारधी समाजाला येत्या काळात प्राधान्याने घरकुल आणि घरासाठी पट्टे देण्यात येणार आहे. गरजूंना दहा लाख घरे देण्याचे आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याला मागणीनुसार घरे देण्यात येईल. यासोबतच पारधी समाजाच्या विकासाला हातभार लावणाऱ्या योजना तयार कराव्यात, यासाठी वाढीव निधी देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी दिले.

यावेळी पूजा सोळंके, वर्षा पवार, पंडित चव्हाण, शिवशक्ती महिला बचतगट यांना प्रतिनिधी स्वरूपात लाभाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमानंतर पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, ई-रिक्षाचे प्रत्यक्ष वितरण केले.


Post a Comment

0 Comments