Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

गरजूंना आवश्यकतेनुसार सहाय्यक उपकरणे पुरविणार - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 



*एक पेड माँ के नाम उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन


अमरावती, दि. २ जून २०२५  : राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी अपंगांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात आवश्यक असलेल्या सुविधा पुरविण्यात येणार आहे. अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार सहाय्यक उपकरणे निशुल्क देण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००  व्या जयंतीनिमित्त नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय आज अलीम्कोतर्फे सहाय्यक उपकरणे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार प्रताप अडसड, केवलराम काळे, चंदू यावलकर, प्रवीण तायडे, राजेश वानखेडे, प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, गरजू व्यक्तींच्या कल्याणासाठी योजना राबविण्यात येत आहे. अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेले सहाय्यक उपकरणासाठी सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. सर्वेक्षणाच्या या पहिल्या टप्प्यात तीन हजार अपंग आढळून आलेले आहेत.या सर्वांना त्यांच्या गरजेनुसार उपकरणे देण्यात येणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्ताने समाजातील सर्व घटकांना मदत करण्यासाठीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार कृत्रिम अवयव वाटप करण्यात येत आहे. अपंग आणि निराधारांना देण्यात येणारे सहाय्यक अनुदान वाढविण्यात आले आहे.

वयोश्री योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी आपल्या परिसरातील अपंगांना याबाबत माहिती देण्यात यावी. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणात त्यांना लाभ होऊ शकेल. त्यासोबतच महाराजस्व अभियानामध्ये शिबिरे घेऊन याबाबतची माहिती देण्यात यावी. राज्य शासनाने शिक्षण, आरोग्य, रोजगार, अपंगांना मदतीचे धोरण स्वीकारलेले आहे. येत्याकाळात जलसंधारणाचे ही कामे प्राधान्याने हाती घेऊन भुजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना १२ तास विज उपलब्ध व्हावी, यासाठी सौर पंप देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी पांदण रस्ता आणि पाणी उपलब्ध करून देणार आहे. पांदण रस्त्यासाठी मॉडेल तयार करण्यात आले आहे. यामध्ये सर्व रॉयल्टी माफ करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात किमान बारा फुटाचा पांदण रस्ता राहणार आहे. गेल्या कालावधीतील जलसंधारणाची केलेली कामे शोधण्यात येत असून यातील किरकोळ दुरुस्ती करून पाणीसाठा तयार होऊ शकेल अशी कामे पूर्ण करण्यात येणार आहे. यासोबतच सर्व शाळा आदर्श करण्यावर भर देण्यात येणार आहे. येत्या वर्षात५  जून ते १५  ऑगस्ट दरम्यान वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने 'एक पेड माँ के नाम' उपक्रमात एक झाड लावून आपल्या आईच्या स्मृती जागवाव्या. यासाठी शासनातर्फे मोफत रोपांचा पुरवठा करण्यात येईल. सर्व नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Post a Comment

0 Comments