Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

ॲग्रीस्टॅक नोंदणीशिवाय शासनाच्या सुविधेचा लाभ मिळणार नाही -जिल्हाधिकारी आशिष येरेकर


अमरावती, दि. १२  (ग्रामीण उदय प्रतिनिधी): केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅक योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना नोंदणीनंतर प्राप्त होणारा शेतकरी ओळख क्रमांक अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येक योजनेमध्ये सहभाग अथवा लाभ मिळविण्याकरीता शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी प्रथम प्राधान्याने नागरी सुविधा केंद्रमध्ये जावून शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

कृषि क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण योजना योग्य आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवून कृषि क्षेत्राचा अधिकाधिक विकास होण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. ॲग्रीस्टॅक हे कृषि क्षेत्रात डेटा आणि डिजीटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यापर्यंत जलद गतीने आणि परिणामकारकरित्या पोहचण्यासाठी स्थापित केलेले जाणारे डिजीटल फाउंडेशन आहे.

 ॲग्रीस्टॅक अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्याची सुविधा नागरी सुविधा केंद्रामार्फत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नागरी सुविधा केंद्रामध्ये जाऊन सातबारा, आठ अ, आधार क्रमाकांशी संलग्न असलेल्या मोबाईलसह संपर्क साधवा. यात मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्न असणे अत्यंत महत्वाचे आहे. नोंदणी करीत असताना आधारशी संलग्न असणाऱ्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी, तसेच नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्वतःचा शेतकरी ओळख क्रमांक याच मोबाईलवर संदेशाद्वारे प्राप्त होणार आहे. सदर शेतकरी ओळख क्रमांक अत्यंत महत्वाचा असल्याने शेतकऱ्यांनी जपुन ठेवावा. जेणेकरुन शेतीसंबधी मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहणार नाही.

अँग्रीस्टॅकमध्ये नोंदणी केली नसल्यास खातेदारांना शासनाच्या कोणत्याही सुविधेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे खातेदारांची प्राधान्याने नोंदणी करण्याच्या सुचना सर्व तलाठी व कृषि सहायकांना देण्यात आली आहे. खातेदारांनी अद्यापही ॲग्रीस्टॅक प्रकल्पांतर्गत शेतकरी ओळख क्रमांक तयार केलेला नसल्यास संबंधित तलाठी आणि कृषि सहायक यांच्याशी संपर्क साधून शेतकरी ओळख क्रमांक तयार करावा. ज्यामुळे भविष्यात शासनाकडून शेतकरी वर्गास देण्यात येणाऱ्या योजना अथवा लाभापासून वंचित राहण्याचे वेळ येणार नाही.


Post a Comment

0 Comments