स्टॉप डायरिया अभियानाला अमरावतीत सुरुवात - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, June 20, 2025

स्टॉप डायरिया अभियानाला अमरावतीत सुरुवात

 

अमरावती, दि. २१  (ग्रामीण उदय प्रतिनिधी): राज्यात २  जून ते ३१  जुलै २०२५  या कालावधीत 'स्टॉप डायरिया' अभियान राबविण्यात येत असून, या अभियानाचा शुभारंभ जिल्ह्यातील नांदगावपेठ ग्रामपंचायतीमध्ये झाला. या मोहिमेचे अंतिम ध्येय अतिसारामुळे होणारे बालमृत्यू 'शून्यावर' आणणे हे आहे. 'अतिसारावर करा मात, स्वच्छता आणि ओआरएसची घेवूनी साथ' हे या अभियानाचे घोषवाक्य आहे.

 अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा राऊत, मंगला मोहोड, विस्तार अधिकारी श्रीमती लकडे ,जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी वनिता शिंदे तसेच आशा सेविका, अंगणवाडी सेविका ,पालकवर्ग, ग्रामसदस्य आणि आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आशा सेविकांनी ओआरएस (ORS) द्रावण कसे बनवायचे आणि हात कसे धुवायचे याचे प्रात्यक्षिक दाखविले, ज्यामुळे उपस्थित लोकांना अतिसार प्रतिबंधाचे सोपे आणि प्रभावी उपाय समजले.

डॉ. प्रवीण पारिसे म्हणाले, 'स्टॉप डायरिया' अभियानात आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, पंचायत विभाग, शिक्षण विभाग, पाणी पुरवठा विभाग यांसारखे विविध शासकीय विभाग सहभागी आहेत. ० ते 5 वयोगटातील बालकांच्या एकूण मृत्यूंपैकी ४.८ टक्के मृत्यू हे अतिसारामुळे होतात. अतिसाराची लक्षणे दिसताच, ओआरएस, झिंक गोळ्या किंवा घरगुती पेये वापरून आपण त्यावर सहज उपचार करू शकतो आणि बालमृत्यू रोखू शकतो. अभियानातंर्गत आशा सेविका आणि आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन अतिसाराने ग्रस्त असलेल्या बालकांना ओआरएस आणि झिंक गोळ्यांचे वाटप करतील. गरजेनुसार त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात संदर्भीत केले जाईल. तसेच, लोकांना ओआरएस बनवण्याची आणि हात धुण्याची योग्य पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे शिकविली जाईल.

'स्टॉप डायरिया' अभियान २०२५  जिल्ह्यात दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. टप्पा-१  मध्ये २  ते १५  जून २०२५  या दरम्यान मोहिमेचे नियोजन, विविध विभागांमध्ये समन्वय, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, जिल्हा व तालुका कृती दलाची स्थापना, आयईसी आराखडा निश्चित करणे आणि ओआरएस व झिंक गोळ्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची खात्री करणे या बाबींचा समावेश आहे. टप्पा-२ अंतर्गत  १६  जून २०२५  ते ३१  जुलै २०२५  या कालावधीत निव्वळ स्तनपानास प्रोत्साहन, रोटा व्हायरस लसीकरण, हातांची स्वच्छता, सुरक्षित पाण्याची व्यवस्था, ओआरएस आणि झिंकचे वितरण, सर्व आरोग्य संस्था आणि अंगणवाड्यांमध्ये ओआरएस-झिंक कॉर्नरची स्थापना आणि अतिसारावरील उपचार यावर भर दिला जाईल.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages