अमरावती, दि. १९ (ग्रामीण उदय प्रतिनिधी): राष्ट्रीय कृषि विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक’ या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी ठिंबक व तुषार संचाची खरेदी करण्यासाठी अनुदान दिल्या जाते. या योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना ५५ टक्के, इतर शेतक-यांना ४५ टक्के अनुदान दिल्या जाते. याच घटकासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प लाभार्थ्यांना २५ टक्के व इतर लाभार्थ्यांना ३० टक्के पूरक अनुदान दिल्या जाते. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना ५५ टक्के व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान दिल्या जाते. या घटकासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प लाभार्थ्यांना २५ टक्के व इतर लाभार्थ्यांना ३० टक्के पूरक अनुदान दिल्या जाते. या घटकासाठी जिल्हा परिषद मार्फत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन मिशन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेमधून अल्प व अत्यल्प लाभार्थ्यांना १० टक्के पुरक अनुदान व इतर लाभार्थ्यांना १५ टक्के पुरक अनुदान असे एकूण ९० टक्के अनुदान दिल्या जाते.
या योजनेंतर्गत ठिंबक व तुषार सिंचन संचाचा लाभ घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांकडे मालकी हक्काचा ७/१२ व ८ अ असणे आवश्यक आहे. तसेच ओलीताची सोय असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांने महाडीबीटी mahadbt.maharashtra.gov.in वर अर्ज करणे आवश्यक आहे. तरी सदर योजनेचा जास्तीत-जास्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments