Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

क्रीडा प्रबोधिनीमध्ये खेळाडूंना प्रवेशाची संधी


अमरावती, दि. १९  (ग्रामीण उदय प्रतिनिधी): महाराष्ट्रातून जास्तीत -जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी राज्य शासनाच्या क्रीडा प्रबोधिनींमध्ये सन २०२५-२६ या वर्षासाठी १९ वर्षांखालील खेळाडूंच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र खेळाडूंना अमरावतीसह नागपूर, अकोला, गडचिरोली, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद आणि पुणे येथील क्रीडा प्रबोधिनींमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे.

हॅण्डबॉल, जलतरण, सायकलिंग, फुटबॉल, ज्युदो आणि जिम्नॅस्टिक्स या सहा खेळांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यस्तरीय पदक विजेते किंवा राष्ट्रीय स्तरावर सहभागी खेळाडूंची सरळ प्रवेश प्रक्रियेद्वारे निवड केली जाईल. तर, इतर खेळाडूंची खेळनिहाय कौशल्य चाचणी घेऊन निवड केली जाईल. निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय तपासणी करून शारीरिकदृष्ट्या सुदृढ खेळाडू अंतिम केले जातील.

अर्जदार खेळाडू १९  वर्षांपेक्षा कमी वयाचा आणि महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. अर्ज करताना राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभागाची प्रमाणपत्रे, आधारकार्ड आणि जन्म प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

इच्छुक खेळाडूंनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे २४ जून २०२५  पूर्वी सादर करावेत. विभागस्तरीय चाचण्या २६  व २७ जून २०२५ रोजी विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे होणार आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments