तंबाखू सोडा, आरोग्य निवडा
अमरावती, दि. ३१ (कार्यालय प्रतिनिधि) : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाण्याचे प्रमाण तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. तंबाखूचे उत्पादन आणि सेवन यामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. मात्र त्यामुळे होणाऱ्या तोंडाच्या कॅन्सरसाठी पहिला क्रमांक लागतो. ६३ टक्के मृत्यू हे असंसर्गजन्य आजार जसे उच्च रक्तदाब, मधूमेह, तोंडाचा, स्तन, गर्भाशय मुखाचा कर्करोग, पक्षाघात, फुफ्फुसाचे आजार आदीमुळे होत आहेत. यासाठी मुख्यता चार ते पाच घटक कारणीभूत आहेत. हे घटक म्हणजे असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव, मद्याचे अतिप्रमाणात सेवन, तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन आणि ताणतनाव हे आहे. जर या कारणावर आपण नियंत्रण ठेवले, तर या आजारामुळे होणारे ७०-८० टक्के मृत्यू टाळू शकतो.
दरवर्षी ३१ मे हा जागतिक तंबाखू नकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. जास्तीत जास्त लोकांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करून लोकांना तंबाखूसारख्या वाईट व्यसनापासून दूर करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. यावर्षीचे या दिवसाचे घोषवाक्य आहे ‘आकर्षणाचा मुखवटा उतरवूया : तंबाखू आणि निकोटीन उत्पादनामागील उद्योगांच्या क्लुप्त्या उघड करूया’ आहे. शासन तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन कमी व्हावे म्हणून विविध मार्गांनी उपाययोजना करत असते. परंतु तंबाखू बनवणाऱ्या कंपन्या त्यामध्ये पळवाटा शोधून वेगवेगळ्याप्रकारे जाहिरात करून तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. ज्यापैकी सिगारेटला पर्याय म्हणून इलेक्ट्रॉनिक सिगारेट हा देखील एक प्रकार बाजारात उपलब्ध होता. ज्यावर राज्य शासनाने तत्काळ बंदी घातली आहे. अश्या व्यसनांमुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या होणाऱ्या असंसर्गजन्य आजारांवर शासनाचा मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. असंसर्गजन्य आजार होण्यासाठी तंबाखू देखील कारणीभूत आहे. त्यामुळे जनजागृतीच्या, शाळेतील मुलांना मार्गदर्शन, कार्यशाळा, सोशल मिडिया, कोपटा २००३ कायदा व इतर माध्यमातून तंबाखूच्या वितरण व विक्रीवर शासनाकडून विविधप्रकारे कार्यवाही आणि जनजागृती करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून शासनाने कोपटा २००३ कायद्याची तरतूद केली आहे.
कोपटा २००३ कायद्यातील कलम कलम ४ अंतर्गत सार्वजनिक धुम्रपानास बंदी केली आहे. कलम ५ अंतर्गत तंबाखूच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी. कलम ६ अ अंतर्गत १८ वर्षाखालील मुलांना तंबाखू विकणे किंवा त्यांच्याकडून विक्री करून घेण्यावर बंदी. कलम ६ ब अंतर्गत शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटर परिसरात तंबाखू विकण्यास बंदी. कलम ७ अंतर्गत तंबाखूजन्य पदार्थाच्या वेष्टन, पाकिटावर चित्रमय धोक्याची सूचना बंधनकारक आहे. यासोबतच १० जुलै २०२३ च्या राज्य शासनाच्या निर्णयानुसार सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये तंबाखुमुक्त करावयाचे आहे.
शासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ ‘या कार्यालयाच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू तथा तंबाखू जन्य पदार्थ विक्री करणे व बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे’ असा फलक. इमारतीच्या इतर द्वारावर जिथून इमारती मध्ये प्रवेश होतो, तसेच प्रत्येक मजल्यावर लिफ्टशेजारी आणि विविध भागामध्ये ‘या परिसरामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणे तथा बाळगणे कायद्याने गुन्हा आहे.याचे उल्लंघन केल्यास २०० रुपये दंड आकारण्यात येईल’ अशाप्रकारचे फलक लावण्यास सूचित केले आहे.
कायद्यामुळे तंबाखूच्या विक्री आणि वापर, तसेच जाहिरातींवर बंधने आली आहेत. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांचा खप वाढविण्यासाठी तंबाखू उद्योगांकडून जाहिरातीच्या वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करून मुलांना आकर्षित करण्यात येते. सोशल मिडीयाच्या माध्यमातून, ई-सिगारेटची चुकीची जाहिरात करून, गुटख्याच्याऐवजी पानमसाला जाहिरात करून तरुणांना प्रोत्साहन देण्यात येते. जेणेकरून तो तरुण आयुष्यभर तंबाखूचा वापर करत राहील. तंबाखूचा व्यवसाय वाढत राहील. अशा वाईट व्यसनापासून तरुणांना वाचविण्यासाठी आणि यावर अंकुश लावण्यासाठी अन्न व औषधी विभाग, पोलिस, शाळा, कामगार विभाग, विक्रीकर विभाग, कृषी विभाग, दंत व वैद्यकीय महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था व इतर विभागांनी पुढाकार घेऊन, तसेच पालकांनी जागरूक राहून तंबाखूला आळा घालण्यास मदत करावी, असे आवाहन आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments