अमरावती, दि. 23 (जिमाका): 'जागतिक तंबाखू नकार दिवस' ३१ मे आणि १७ मे रोजी 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' साजरा करण्यात येतो. या निमित्ताने आरोग्य विभागाने तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत आणि असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंधाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे.
तरुणाईमध्ये वाढते तंबाखूचे व्यसन चिंताजनक आहे. 'ग्लोबल युथ टोबॅको सर्वे २०१९' नुसार, भारतात १३ ते १५ वयोगटातील जवळपास ८.५ टक्के विद्यार्थी तंबाखूचे सेवन करतात. तंबाखूची सहज उपलब्धता, सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, मित्रांचा दबाव, मोठ्यांचे अनुकरण, आवडत्या नटांची नक्कल आणि ताणतणाव यांसारख्या कारणांमुळे तरुणाईमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने १९८७ पासून ३१ मे हा दिवस 'जागतिक तंबाखू नकार दिवस' म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. यामागे तंबाखूचा वापर थांबवणे आणि त्याच्या दुष्परिणामांबद्दल जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे हा प्रमुख उद्देश आहे.
तंबाखूमुळे होणारे गंभीर आजार आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या आकडेवारीनुसार, ८०-९०टक्के तोंडाच्या कॅन्सरचे प्रमुख कारण तंबाखू हे आहे. भारतात दरवर्षी सुमारे १३.५०लाख लोकांचा मृत्यू तंबाखूमुळे होतो. तंबाखूमुळे तोंडाचा, अन्ननलिकेचा, श्वासनलिकेचा, फुफ्फुसाचा कॅन्सर, दातांचे व हिरड्यांचे आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयासंबंधित आजार, लकवा, पुरुषांमध्ये नपुंसकता, स्त्रियांमध्ये गर्भपात, मृत बाळ जन्माला येणे, तसेच नवजात शिशुमध्ये क्लेफ्ट लीप (फाटलेला ओठ) आणि क्लब फूट यांसारखी व्यंगे निर्माण होतात.
भारताचा तंबाखू उत्पादन आणि सेवनात दुसरा क्रमांक असला तरी, तोंडाच्या कॅन्सरच्या रुग्णांच्या संख्येत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. एकूण मृत्यूंपैकी ६३ टक्के मृत्यू हे उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग (तोंडाचा, स्तनांचा, गर्भाशय मुखाचा), पक्षाघात आणि फुफ्फुसाचे आजार यांसारख्या असंसर्गजन्य आजारांमुळे होतात. यामागे असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव, मद्याचे अतिसेवन, तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन आणि ताणतणाव हे प्रमुख घटक कारणीभूत आहेत. या घटकांवर नियंत्रण ठेवल्यास, या आजारांमुळे होणारे ७०-८० टक्के मृत्यू टाळता येऊ शकतात. शासनाच्या जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर तुम्ही तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करत असाल तर दर महिन्याला स्वतःच्या तोंडाची तपासणी करावी. जिभेवर, गालाच्या आतील भागावर, हिरड्यांवर किंवा घशामध्ये लाल चट्टा, पांढरा चट्टा, तोंड उघडता न येणे किंवा १५ दिवसांपेक्षा जास्त काळ न भरलेली जखम अशी कर्करोगपूर्व लक्षणे आढळल्यास, त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात दंत शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घ्यावी. असे रुग्ण पुढील तपासणी व उपचारासाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथे संदर्भित केले जातील.
कोटपा २००३ कलम ४अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणे हा गुन्हा असून २०० रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच, कलम ६ ब नुसार शैक्षणिक संस्थेच्या १००मीटर परिसरात तंबाखू विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या भुरळ घालणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नका. तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments