पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती
– एका आदर्श महिला नेतृत्वाला वंदन!
भारतीय इतिहासात मोठी युद्धे झाली, साम्राज्ये उभी राहिली आणि कोसळली. परंतु, या साऱ्या घडामोडींमध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या कार्याने समाजहित, धर्मरक्षण आणि जनकल्याण या मूल्यांना सर्वोच्च मान दिला, त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्थान अग्रभागी आहे. त्यांच्या जीवनकार्याने सिद्ध केलं की एका स्त्रीचं नेतृत्व केवळ राजसिंहासनापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकतं. अहिल्यादेवी होळकर या केवळ इंदूरच्या होळकर घराण्याच्या राणी नव्हत्या तर त्या एक द्रष्ट्या प्रशासक, न्यायप्रिय नेत्या, धर्मपरायण समाजसुधारक आणि स्त्री सक्षमीकरणाच्या आद्य पुरस्कर्त्या होत्या. त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त, त्यांचे स्मरण त्यांच्या विचारांमधून नव्याने प्रेरणा घेण्याचे निमित्त आहे!
प्रशासन आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नेतृत्व केवळ राज्यकारभारापुरते मर्यादित नव्हते, तर त्यात धर्म, न्याय, लोकसेवा आणि नीतीमूल्यांचे सखोल अधिष्ठान होते. त्यांनी महेश्वरला आपली राजधानी बनवली. ही राजधानी एक आदर्श प्रशासनाचे प्रमाण होते. येथे अहिल्यादेवींनी एक पारदर्शक, न्यायपूर्ण आणि लोकाभिमुख राज्यकारभार चालवला. तेव्हाच्या काळात एक राणी प्रत्यक्षपणे जनतेच्या तक्रारी ऐकून त्यावर तत्काळ निर्णय घेते, अशी कल्पनाही करवत नाही. पण अहिल्यादेवी दररोज प्रजेसोबत संवाद साधत, त्यांच्या अडचणी समजून घेत आणि न्याय देत. हे त्यांचे कार्य आजच्या लोकशाही व्यवस्थेलाही मार्गदर्शक ठरावे असेच आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य धार्मिक स्थळांचे पुनरुज्जीवन आणि समाजकल्याण यासाठी वाहिले. काशी विश्वनाथ, गंगाघाट, रामेश्वरम, सोमनाथ, द्वारका अशा अनेक प्राचीन आणि पवित्र स्थळांचे जीर्णोद्धार करून त्यांनी भारतीय सांस्कृतिक एकात्मतेचे धागे पुन्हा मजबूत केले. याशिवाय देशभर त्यांनी शेकडो धर्मशाळा, घाट, कुंड, विहिरी, अन्नछत्रे आणि विश्रामगृहे उभारली. हे कार्य कोणत्याही जाती-धर्माचा भेद न करता सर्वसामान्य जनतेसाठी केले गेले. त्यांच्या या पुढाकारामुळे हजारो लोकांना निवारा, अन्न आणि आधार मिळाला. त्यांचे हे सामाजिक कार्य आजही संपूर्ण भारतात “लोककल्याणकारी राज्यशासनाचा” आदर्श नमुना मानले जाते. प्रशासन आणि समाजकारण यांचा असा सुरेख मिलाफ क्वचितच इतिहासात पाहायला मिळतो आणि त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर!
स्त्री सक्षमीकरणाचे आदर्श!
अठराव्या शतकातील भारतात स्त्रियांना घराच्या चार भिंतींपलीकडे जाण्याची मुभा नव्हती. पण अशा काळातही अहिल्यादेवी होळकर यांनी स्त्रिया आत्मनिर्भर बनाव्या यासाठी पुढाकार घेतला. त्या काळात त्यांनी सुरू केलेला महेश्वरी साडी उद्योग केवळ व्यवसाय नव्हता तर तो एक सामाजिक क्रांतीचा भाग होता. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी काशी आणि इतर ठिकाणांहून कुशल विणकरांना महेश्वरला बोलावले. त्यांनी स्थानिक महिलांना हातमाग प्रशिक्षण दिले, आणि महिलांना घरोघरी बसून उत्पन्न मिळवण्याची संधी निर्माण केली. या उद्योगाने हजारो महिलांना केवळ रोजगारच दिला नाही, तर स्वाभिमान, ओळख आणि आत्मसन्मानही दिला. आजही महेश्वर व आसपासच्या भागात महेश्वरी साड्या विणणाऱ्या हजारो महिला पहायला मिळतात.
या साड्या केवळ पारंपरिक पोशाख नाहीत, तर त्या अहिल्यादेवींच्या द्रष्ट्या धोरणांचा आणि स्त्रीसन्मानाच्या तत्त्वांचा वस्त्ररूप अविष्कार आहेत. त्यांनी कोणत्याही जाती, धर्म, वर्ग यांचा भेद न करता सर्वांसाठी कार्य केले. १३ ऑगस्ट १७९५ रोजी या महान राणीने देहत्याग केला. धर्मशाळा, भजनमंडळे, सार्वजनिक पाणवठे आणि शिक्षणाच्या सुविधा त्यांनी महिलांसाठी खुल्या केल्या. त्या काळात जेव्हा स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान होते, तेव्हा त्यांनी महिलांना धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची मुभा दिली. अहिल्यादेवींच्या या कार्यामुळेच त्यांना ‘पुण्यश्लोक, ‘लोकमाता’ आणि ‘राजमाता’ अशा सन्मानार्थ उपाधी प्राप्त झाल्या. केंद्र शासनाने त्यांच्या स्मृतींना वंदन म्हणून टपाल तिकीट प्रकाशित करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला आहे. इ.स. १७६७ साली त्यांनी महेश्वर येथे हातमाग उद्योग सुरू करून एक स्थायिक, गुणवत्ताधिष्ठित आणि बाजारपेठेचा विचार करणारा स्थानिक उद्योग उभारला. यामागील हेतू होता तो स्त्रियांना उपजीविकेचा मार्ग उपलब्ध करून देणे आणि महेश्वरला धार्मिक व पारंपरिक वस्त्रकलेचे केंद्र बनवणे. महेश्वरी साडी आणि अहिल्यादेवी यांचे नाते केवळ वस्त्रनिर्मितीपुरते मर्यादित नाही, तर ते महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक वारसा आणि स्थानिक उद्योगाचा उत्कर्ष यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे.
महेश्वरी साड्यांची क्रेझ आजही कायम !
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३१ मे २०२५ रोजी ३०० वी जयंती आहे. याच निमित्ताने त्यांचे कार्य आणि विचारावर आधारित विशेष लेख !
May 31, 2025
0
...
Tags
Post a Comment
0 Comments