'समृद्धी'वर अपघातामुळे थांबलेल्या वाहनांना भरधाव कंटेनरची धडक, १८ वाहनांचे नुकसान; ९ जखमी



सिंदखेडराजा/दुसरबीड (जि. बुलढाणा): समृद्धी महामार्गावर दुसरबीडजवळील तढेगाव परिसरात शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक भीषण विचित्र अपघात घडला. महामार्गावर पहाटे उलटलेला एक ट्रक बाजूला हटवत असताना, रांगेत थांबलेल्या वाहनांना मागून येणाऱ्या भरधाव अवजड कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे तब्बल १८ वाहने एकमेकांवर आदळून मोठे नुकसान झाले असून, ९ प्रवासी जखमी झाले आहेत.
मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर चॅनेल क्रमांक ३२२ जवळ सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सिमेंट वाहतुकीचा एक रिकामा ट्रक टँकर उलटला होता.
 हा ट्रक हटवण्यासाठी महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. क्रेन येण्यास विलंब झाल्याने ट्रक बाजूला करण्याचे काम अपूर्ण होते आणि त्यामुळे महामार्गावर वाहनांची लांबच लांब रांग लागली होती.
दिवाळी आटोपून मुंबई आणि पुण्याकडे परतणारे अनेक प्रवासी आपल्या कारमध्ये बसून मार्ग मोकळा होण्याची वाट पाहत होते. त्याच वेळी मागून भरधाव वेगाने आलेला एक अवजड कंटेनर उभ्या असलेल्या कारवर आदळला. या धडकेच्या जोराने रांगेतील १८ वाहने एकामागून एक एकमेकांवर आदळली आणि काही कारचा तर पूर्णपणे चक्काचूर झाला.
या अपघातात महिला आणि लहान मुलांसह एकूण ९ जण जखमी झाले आहेत.
किरकोळ जखमींवर घटनास्थळीच रुग्णवाहिकेत उपचार करण्यात आले, तर काही जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आले आहे. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
जखमींची नावे: पोलिसांच्या नोंदीनुसार, अकोल्याच्या सरला गजानन कंकाळ (४२) यांच्या हाताचे हाड मोडले आहे. तसेच आराध्या मनीष काकडे, मनीषा मनीष काकडे, रिता अशोक मिश्रा, मयंक अशोक मिश्रा, स्वप्निल बाबाराव पांडव (सर्व रा. पुणे) आणि कृष्णा कपिल गौतम व शुभम साखळे (दोघे रा. अकोला) हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर घटनास्थळी प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकू आल्या आणि एकच गोंधळ उडाला. महामार्ग पोलीस, समृद्धीची आपत्कालीन यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या महिला व मुलांना बाहेर काढले. माजी मंत्री राजेश टोपे आणि माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह मदतकार्यात सहभाग घेतला आणि ताटकळलेल्या प्रवाशांना खाण्यापिण्याचे साहित्य दिले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प झाली होती.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (NCRB) २०२४ च्या आकडेवारीनुसार देशातील आणि महाराष्ट्रातील रस्ते अपघातांची गंभीर परिस्थिती दर्शवते.
भारतातील एकूण रस्ते अपघात: २०२४ च्या आकडेवारीनुसार, भारतात एकूण सुमारे ४.६८ लाख रस्ते अपघात झाले आहेत.
देशातील एकूण मृत्यू: या रस्ते अपघातांमध्ये तब्बल १.७५ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
 एकूण अपघाती मृत्यूंपैकी ५७% मृत्यू हे केवळ अतिवेगामुळे (Over-speeding) होतात.
महाराष्ट्रातील परिस्थिती: महाराष्ट्रात दररोज रस्ते अपघातात सरासरी ४२ ते ४३ प्रवाशांचा मृत्यू होतो.
Previous Post Next Post

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday