3 लाख 6 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 153 कोटी जमा


 

* दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 हजाराची मदत

 

अमरावती, दि.७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : कमी पर्जन्यमान आणि भूगर्भातील कमी जलसाठ्यामुळे यावर्षी दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. कमी पर्जन्यमानाचा खरीप पिकांवर देखील परिणाम झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिवाळीपूर्वी प्रत्येकी 5 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार आतापर्यंत 3 लाख 6 हजार 709 शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष रक्कम जमा करण्यात आली आहे.

 

              एलनिनोच्या प्रभावामुळे यावर्षी पर्जन्यमान कमी झाले. त्याचा परिणाम कापुस, सोयाबिन, तुरसह अन्य पिकांवर झाला. बहुतांश भागात शेतकऱ्यांना उत्पन्नात घट आली. पुढे रब्बी आणि उन्हाळी पिकांवर देखील विपरीत परिणाम होणार आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने दुष्काळी परिस्थिती जाहीर करून उपाययोजना सुरु केल्या आहे. त्यात विविध दिलासादायक बाबींचा समावेश आहे.

 

            दुष्काळीस्थितीमुळे हवालदील शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 5 हजार रुपये जमा करण्याची घोषणा केली होती. जिल्ह्यात सोमवार, दि. 2 नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांच्या आधारलिंक खात्यात रक्कम जमा केली जात आहे. तालुका व जिल्हास्तरावर खाती स्विकृत करण्यात आलेल्या आतापर्यंत 3 लाख 6 हजार 709 खात्यांमध्ये प्रत्येकी 5 हजार याप्रमाणे 153 कोटी 35 लाख 45 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.

 

            आतापर्यंत रक्कम जमा करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची तालुकानिहाय संख्या पुढील प्रमाणे आहे. अमरावती तालुक्यात 20 हजार 460 शेतकऱ्यांना 10 कोटी 23 लाख, अचलपूर तालुक्यात 29 हजार 074 शेतकऱ्यांना 14 कोटी 53 लाख 70 हजार, अंजनगाव सूर्जी तालुक्यात 23 हजार 381 शेतकऱ्यांना 11 कोटी 69 लाख 5 हजार, भातकुली तालुक्यात 21 हजार 368 शेतकऱ्यांना 10 कोटी 68 लाख 40 हजार, चांदूर रेल्वे तालुक्यात 11 हजार 897 शेतकऱ्यांना 5 कोटी 94 लाख 85 हजार, चांदूर बाजार तालुक्यात 18 हजार 956 शेतकऱ्यांना 9 कोटी 47 लाख 80 हजार, चिखलदरा तालुक्यात 8 हजार 44 शेतकऱ्यांना 4 कोटी 2 लाख 20 हजार, दर्यापूर तालुक्यात 32 हजार 500 शेतकऱ्यांना 16 कोटी 25 लाख, धामणगाव रेल्वे तालुक्यात 23 हजार 57 शेतकऱ्यांना 11 कोटी 52 लाख 85 हजार, धारणी तालुक्यात 14 हजार 508 शेतकऱ्यांना 7 कोटी 25 लाख 40 हजार, मोर्शी तालुक्यात 30 हजार 991 शेतकऱ्यांना 15 कोटी 49 लाख 55 हजार, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 29 हजार 198 शेतकऱ्यांना 14 कोटी 59 लाख 90 हजार, तिवसा तालुक्यात 11 हजार 231 शेतकऱ्यांना 5 कोटी 61 लाख 55 हजार, वरूड तालुक्यात 32 हजार 44 शेतकऱ्यांना 16 कोटी 2 लाख 20 हजार इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे.

 

            तालुकास्तरावरून मंजूरी देण्यात आलेल्या खात्यांना जिल्हास्तरावरून तातडीने मंजुरी देण्यात आली. यानंतर राज्यस्तरावरून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम तातडीने जमा करण्यात येत आहे. अद्याप खाते स्विकृती व रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरुच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.

أحدث أقدم

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday