बहिरम बाबा भक्तांचा अनेक वर्षांचा संघर्ष संपला!*
DGBIPL कंपनी मुळे मार्गावरील पुलाचे कामही लवकरच होणार
चांदूरबाजार दिनांक ७
( ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या बहिरम यात्रेचा मार्ग अखेर MSIDC अंतर्गत श्री नितीनजी गडकरी यांचे मंत्रालय मार्फत मार्ग सुखद होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांच्या समस्येने त्रस्त झालेल्या भाविक आणि ग्रामस्थांचा संघर्ष आता संपत असून, MSIDCमार्फत DGBIPL कंपनीच्या पुढाकाराने या मार्गाचे अतिशय वेगाने आणि दर्जेदार सिमेंट-काँक्रीटचे काम सुरू आहे. या विकासकामामुळे यात्रेकरूंनी व स्थानिक नागरिकांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे.
काय होता नेमका प्रश्न?
चांदूर बाजार तालुक्यातील बहिरमची यात्रा सुमारे एक ते दीड महिना चालते. यात्रेसाठी महाराष्ट्रच नव्हे तर शेजारील मध्य प्रदेशातूनही लाखो भाविक येतात. मात्र, चांदूरबाजार ते बहिरम हा मार्ग अत्यंत खराब आणि धोकादायक बनला होता. दरवर्षी यात्रेपूर्वी रस्त्याची केवळ तात्पुरती डागडुजी केली जात असे; पण यात्रा संपण्याआधीच रस्त्यावर पुन्हा मोठे खड्डे पडत असत. या खड्ड्यांमुळे दरवर्षी अनेक भाविकांना अपघातांना सामोरे जावे लागत होते. आता या तात्पुरत्या डागडुजीपासून प्रवाशांची कायमची सुटका होत आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य
गेल्या वर्षी (२०२५) बहिरम यात्रेदरम्यान DGBIPL कंपनीने भाविक व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्यंत गंभीर आणि प्रभावी उपाययोजना राबवल्या होत्या. कंपनीच्या या सुरक्षा नियोजनामुळे मागील यात्रेदरम्यान एकाही अपघातात कोणाला जीव गमवावा लागला नाही. तीच सकारात्मक विचारधारा कायम ठेवत, २०२६ च्या बहिरम बुवाच्या यात्रेसाठीही कंपनीकडून विशेष सुरक्षा व वाहतूक उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
कोणत्या मार्गांचे काम वेगात सुरू?
सध्या या प्रकल्पांतर्गत खालील मार्गांचे उत्कृष्ट दर्जाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे:
* चांदूरबाजार ते ब्राह्मणवाडा थडी
* ब्राह्मणवाडा थडी ते शिरजगाव कसबा
* शिरजगाव कसबा ते करजगाव मार्गे खरपी
शेतकऱ्यांनाही होणार मोठा फायदा
या केवळ रस्तेनिर्मितीचा लाभ केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर परिसरातील शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणावर होणार आहे. रस्त्याअभावी शेतमाल वाहतुकीत शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. आता दर्जेदार काँक्रीट रस्ता उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल, भाजीपाला आणि धान्य वेळेवर बाजारपेठेत पोहोचवणे सुलभ होणार आहे.
एकंदरीत, या विकासकामामुळे तालुक्यातील नागरिकांचा प्रवास अतिशय सुखदायी होणार असून, मध्य प्रदेश आणि जिल्ह्यातील भाविकांचा प्रवास आता पूर्णपणे सुरक्षित आणि आनंददायी ठरणार आहे.
