भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
अमरावती, दि.७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आणि 'जनजातीय गौरव दिना'चे औचित्य साधून धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत 'जनजातीय गौरव सेवा सप्ताह-२०२६'चे आयोजन करण्यात आले आहे.
आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी व शासनाच्या विविध योजना थेट शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित या 'जनजातीय गौरव सेवा सप्ताहात' जास्तीत -जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी केले आहे.
या सप्ताहाची सुरुवात ११ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,अमरावती येथे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या उपस्थितीतील पत्रकार परिषदेने होईल. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी धारणी येथील प्रशासकीय इमारतीत प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकास्तरीय पत्रकार परिषद पार पडेल.
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान, धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, न्यूक्लियस बजेट योजना आणि महिला बचत गटांना विविध लाभांचे वितरण १३ नोव्हेंबर रोजी केले जाईल. तसेच शेती, सिंचन, रोजगार आणि स्वयंरोजगाराबाबत विशेष मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली आहेत.
धारणी येथील जयस्तंभ चौक परिसरातील आदिवासी महापुरुषांच्या स्मारक व पुतळ्यांची स्वच्छता करून १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी भव्य 'दिपोत्सव' साजरा केला जाईल. तसेच आदिवासी संस्कृती, अस्मिता आणि पूजा पद्धतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील.
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यादरम्यान धारणी प्रकल्पांतर्गत कलासंगम मंचासाठी निवड झालेले कलावंत आपली कला सादर करतील. तसेच गेल्या १२ वर्षांतील पद्म पुरस्कारप्राप्त आदिवासी व्यक्ती, समाजसेवक, बुद्धिजिवी आणि आदिवासी नायकांच्या नातेवाईकांचा विशेष सत्कार केला जाईल.
१६ नोव्हेंबर रोजी सेतू व महा-ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून आधार कार्ड दुरुस्ती/अद्ययावतीकरण शिबिर आणि वनपट्टेधारकांना शासकीय योजनांचे लाभ वाटप केले जाईल. १७ नोव्हेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय धारणी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सहकार्याने सर्वंकष आरोग्य तपासणी शिबिर, मधुमेह, रक्तदाब तपासणी तसेच सिकलसेल आजाराबाबत जनजागृती व तपासणी केली जाईल. सोबतच पोषण आहार व पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व पटवून दिले जाईल.
सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी १८ नोव्हेंबर रोजी बँक खाते उघडणे, डिजिटल व्यवहार, वित्तीय साक्षरता, युवक-युवतींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, आणि प्रधानमंत्री मुद्रा व इतर योजनांच्या ऑन-द-स्पॉट नोंदणी शिबिरांचे आयोजन करून सप्ताहाची सांगता होईल.
